कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:00 PM2021-11-19T20:00:38+5:302021-11-19T20:10:29+5:30
सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते
पुणे : महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कंगना, गोखले, गुप्ते यांना बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले असेल तर ते राज्यघटनेने दिले. मात्र, ज्या राज्यघटनेने हे स्वातंत्र्य दिले, त्यालाच नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना राणौत, विक्रम गोखले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले आहेत. त्यांची स्क्रिप्ट नागपूरला तयार होते, असा आरोप ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी केला.
''सामान्य लोकांनी अशी वक्तव्ये केली असती तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले गेले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा कंगना, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी अवमान केला आहे. त्यामुळे या मंडळींविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास येत्या शुक्रवारपासून विक्रम गोखले यांच्या घरासमोर गांधीजींच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणार आहे. त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशाराही माने यांनी दिला.''
''मी आंबेडकरवादी आहे. आम्हालादेखील गांधी, टिळक आणि सावरकरांचे विचार मान्य नाहीत. विचारांमध्ये मतभेद असतातच. पण यालाच लोकशाही म्हणतात. परंतु, याच जागरूक लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, असेही ते
म्हणाले.''
...त्यांनी गांधींबद्दल बोलू नये
देशद्रोही वक्तव्य करणारे कंगना, गोखले, गुप्ते यांचे शिक्षण किती हे मला माहीत नाही. मात्र, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला, असे यांना वाटत असेल, तर यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. केंद्र सरकारसह काही मंडळींना देशाचा इतिहास खोडून २०१४पासून इतिहास मांडायचा आहे. २०१४पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, असे जग सांगत आहे. २०१४पासून हुकुमशाही वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा चातुर्वण्य व्यवस्था आणि हुकुमशाही आणायची आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत, ज्यांना गांधीमार्ग कळत नाही, त्यांनी गांधींबद्दल बोलू नये, अशा शब्दात माने यांनी कंगनाला फटकारले.