दुर्धर आजारांनी ग्रस्त महिलेला कन्यारत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:08 PM2018-03-12T13:08:44+5:302018-03-12T13:08:44+5:30
ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता.
पुणे : एकाच वेळी तीन आजारांनी ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. तीनही आजारांचे उपचार करण्याबरोबरच आई आणि बाळाला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. प्रसूतीनंतर दोघांनाही सध्या कोणताही धोका नाही. ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिला २० वर्षांपासून पॅरेनॉईड स्क्रिझोफे्रनिया हा आजार आहे. त्यासाठी तिला विविध प्रकारच्या गोळ्या सुरू होत्या. ‘इलेक्ट्रोकन्वलझिव्ह थेरपी’ (ईसीटी) ही उपचार पद्धतीही वापरण्यात आली. मात्र, त्याचा फारसा परिणाम होताना दिसला नाही. त्यामुळे गोळ्यांचे प्रमाण वाढवावे लागले. हे उपचार सुरू असतानाच महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीला गाठी (फायब्रॉईड) असल्याचे निदान झाले. त्यानंतर मधुमेह आजारानेही तिला ग्रासले. त्यातच या महिलेचे वयही जास्त असल्याने धोका अधिक होता. लग्नानंतर दहा वर्षे त्यांना मूल होत नव्हते.
असा पहिलाच रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता. हे अत्यंत दुर्मिळ असल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. त्यामुळे नातेवाइकांना काळजी लागली होती. त्यांनी सुरुवातीला गर्भपात करण्याची सूचना केली होती. मात्र, रुग्णालयातील मनोविकार विभागासह स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागातील सर्व डॉक्टर्स व सहकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवून नातेवाईकांना आधार दिला. मागील आठवड्यात महिलेने सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलीला जन्म दिला. दोघींचेही आरोग्य चांगले आहे. डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अरुण अंबडकर, डॉ. दीपाली जाधव, डॉ. पी. डब्ल्यू. सांबरे, डॉ. मनजित संत्रे आणि सहकाºयांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले.