एफटीआयआय संचालकांच्या नोटिशीला केराची टोपली
By admin | Published: July 17, 2015 04:19 AM2015-07-17T04:19:28+5:302015-07-17T04:19:28+5:30
आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांनी दिलेल्या नोटिशीला
पुणे : आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालकांनी दिलेल्या नोटिशीला विद्यार्थ्यांनी केराची टोपली दाखवत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. नियामक मंडळाच्या अध्यक्षांसह इतर सदस्यांची नियुक्ती कोणत्या निकषांवर केली आहे, हे जोपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सांगितले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे स्टुडंट असोसिएशनने म्हटले आहे.
एफटीआयआयचे संचालक डी.जे नारायण यांनी बजावलेल्या नोटिशीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे प्रमुख राकेश शुक्ला व विकास अर्स यांनी सांगितले की, मंत्रालयाशी पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. तसा ईमेलही १४ जुलैला पाठविला होता. पण तो मेल मिळाल्याची साधी पोचपावती देखील आम्हाला मिळालेली नाही. यातच अचानक संचालकांकडून आम्हाला आंदोलन मागे घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारचा इशारा देण्यात आला आहे.
संचालकांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता?
एफटीआयआयचे संचालक म्हणून डी.जे. नारायण यांचा शुक्रवारी शेवटचा
दिवस आहे. मात्र, नवीन संचालकांच्या मुलाखतींना स्थगिती देण्यात आल्याने
त्या जागी कोणाची नेमणूक करायची? असा प्रश्न शासनासमोर आहे. या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच नव्या संचालकांला नियुक्त करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे होणार आहे. त्यामुळे आंदोलनाचा प्रश्न सुटेपर्यंत तरी डी.जे. यांनाच काही महिन्यांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.
‘सेव्ह एफटीआयआय’कडून आवाहन
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे नियामक मंडळाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे आहे. नव्या मंडळास वर्षभर काम करण्याची संधी द्यावी. त्यांनी संस्थेसंदर्भात चुकीचे निर्णय घेतले तर विद्यार्थ्यांनी खुशाल आंदोलन करावे. त्या आंदोलनास आम्हीही पाठिंबा देऊ, मात्र सध्या सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घ्यावे, असे आवाहन ‘सेव्ह एफटीआयआय’तर्फे करण्यात आले.