अरुण साळुंके यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 11:05 PM2018-02-02T23:05:42+5:302018-02-02T23:06:03+5:30
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०१७-१८ या वर्षीचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानदीप विद्यालय शिवे ता. खेड येथील सहशिक्षक अरुण साळुंके यांना आ. प्रसाद लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चाकण : सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०१७-१८ या वर्षीचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानदीप विद्यालय शिवे ता. खेड येथील सहशिक्षक अरुण साळुंके यांना आ. प्रसाद लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, संचालक गुलाबराव गवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण साळुंके हे गेली २५ वर्षे दुर्गम व डोंगरी भागात आसलेल्य शाळेत काम करीत आहेत. ते गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करतात. शाळेमध्ये ज्यादा तास घेऊन शाळेचा १००% निकाल लावण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. मुलांना वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबर त्यांना वैयक्तिक मदत करणे तसेच पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यात त्यांना विशेष रुची आहे. शाळेच्या भौतिक सुविधेसाठी त्यांनी कंपनीच्या सीएसआर फंडातून लाखो रुपये शाळेला मिळवून दिले आहेत. यापूर्वी त्यांना खेड पंचायत समितीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.
अरुण साळुंके यांनी त्यांच्या मूळ गावी वडिलांच्या नावे ग्रंथालय काढले असून त्या ग्रंथालयाची दोन मजली इमारत असून दहा हजार पुस्तके आहेत. चाकण येथेही त्यांनी प. पू. डॉ. हेडगेवार सार्वजनिक वाचनालयाची सन २००५ मध्ये स्थापना केली. या ग्रंथालयात आठ हजार पुस्तके आहेत. या व्यतिरिक्त गेल्या दहा वर्षा पासून दरवर्षी रक्तदान शिबिरे, व्याख्यानमाला ते वाचनालयाच्या माध्यमातून घेतात. नेत्रदान, त्वचादान व अवयवदान विषयी जनजागृती करत असतात. ते वसुंधरा बहुउद्देशीय संस्था चाकणचे संस्थापक सदस्य असून या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण जागृती, पर्यावरण शिबिरे, सर्प समज-गैरसमज इ. उपक्रम राबविण्यात सहभाग घेतात.
चाकण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याचा व जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. 'गाव तेथे ग्रंथालय' यासाठी ते आग्रही असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक गावात वाचनालय व ग्रंथालय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली आहे. सेकण्डरी स्कूल्स एम्प्लॉइज् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या महाराष्ट्रात वीस शाखा असून तीस हजार माध्यमिक शिक्षक सभासद आहेत. ही संस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य क्रेडिट सोसायटी आहे. या सोसायटीच्या माध्यमातून प्रतिवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना "कर्मवीर भाऊराव पाटील" आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने दिला जाणारा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथे आ.प्रसाद लाड, संस्थेचे अधक्ष चंद्रकांत पाटील, सचिव किशोर पाटील, संचालक गुलाबराव गवळे यांच्या हस्ते देण्यात आला.