Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 03:13 PM2021-10-12T15:13:42+5:302021-10-12T15:14:03+5:30
पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
कळस : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Karmayogi Shankarraoji Patil Sahakari Sakhar Karkhana) पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे कारखान्यावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) अलिप्त भुमिका घेतल्याने भाजपच्या वतीने व काही अपक्ष असे ४६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अर्ज भरताना व छाननी मध्ये कारखान्याला ऊस पुरवठा न केल्याने ९ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यामध्ये विद्यमान सात संचालकांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
बिनविरोध झालेले नवनियुक्त संचालक मंडळ
(इंदापूर गट) - भरत शहा, शांतीलाल शिंदे,रवींद्र सरडे, (कालठण गट) - हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे, (शेळगाव गट) - बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, (भिगवन गट) - पराग जाधव, विश्वास देवकाते, गायकवाड निवृत्ती, (पळसदेव गट) - भूषण काळे, प्रवीण देवकर, देवकर रतन, (महिला राखीव) - शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम, (अनुसूचित जाती जमाती) - दुर्गे केशव विनायक, (इतर मागास प्रवर्ग) - सतीश उद्धव व्यवहारे (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग) - पारेकर हिरा शंकर (ब वर्ग प्रतिनिधी) - वसंत मोहोळकर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे पी गावडे यांनी काम पाहिले.
''इंदापुर तालुक्यातील सहकारी तत्वावरील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती बिनविरोध करुन हर्षवर्धन पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र कारखानदारी अडचणीत असल्याने सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्या समोर असणार आहे.''