कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता २५०० रुपये प्रमाणे देणार - हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:31 PM2023-10-31T13:31:21+5:302023-10-31T13:33:39+5:30
कर्मयोगी सहकारी आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील,असा दावा त्यांनी केला....
इंदापूर : सन २०२३ -२४ या आगामी ऊस गळीत हंगामात कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता २५०० रुपये प्रमाणे देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. ३०) केली. त्यानंतरचे ऊस बिलाचे हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील. कर्मयोगी सहकारी आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील,असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, किती ही अडचणी आल्या तरी ही सर्वांच्या सहकार्याने कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामात ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल. त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. गळीत झालेल्या ऊसाची, तोडणी व वाहतुकीची सर्व बिले वेळेवर व काटेकोरपणे हंगाम संपेपर्यंत दिली जातील. कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला नियमितपणे होत आहेतच. दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे, असे ही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
संचालक हनुमंत जाधव, छगन भोंगळे,अंबादास शिंगाडे, भूषण काळे,राहुल जाधव,शांतिलाल शिंदे, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड,प्रवीण देवकर,रतन देवकर,केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, शारदा पवार, कांचन कदम, पराग जाधव, प्रदीप पाटील,रवींद्र सरडे,वसंत मोहोळकर कार्यकारी संचालक देवराव लोकरे यावेळी उपस्थित होते.