कळमोडी धरण तयार; पण उपसा योजना प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:18 AM2018-12-18T01:18:08+5:302018-12-18T01:18:22+5:30
आंदोलनाचा इशारा : ८४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी
दावडी : कळमोडी धरण बांधून तयार आहे; परंतु धरणातून प्रस्तावित असलेली उपसा जलसिंचन योजना अनेक वर्षे प्रलंबित आहे. सातगाव पठार भागातील ५,०६६ हेक्टर क्षेत्र व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव या गावांतील ८४३ हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडीचे पाणी मिळण्यासाठी खेड व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा नदीवर बांधण्यात आलेल्या कळमोडी धरणाची एकूण साठवण क्षमता दीड टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणी चासकमान धरणात येते. चासकमान धरणातील काही पाणीसाठा पुन्हा पाईपलाईनद्वारे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या परिसरातील वेळ नदीत सोडण्यात येणार होते. वेळ नदी आंबेगाव तालुक्यातील सात गावांतून पुढे जाते,ती खेड तालुक्याच्या पूर्व भागातून जाते. मात्र, ही योजना बारगळली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे कळमोडी धरण्याच्या पाण्याबाबत भिजत घोंगडे पडले आहे. खेड तालुुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने या भागांतील नागरिकांच्या भावना तीव्र आहे. दुष्काळाची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदानात पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटी घेतल्या. या भागातील सर्व गावांचे सरपंच, कळमोडी धरण प्रकल्प कृती समितीचे पदाधिकारी, कनेरसर येथील यमाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मोहनराव दौंडकर व कुरवंडीचे सरपंच सुनीलराव तोत्रे यांच्या पुढाकाराने पेठ येथे बैठक झाली. या बैठकीस वरूडेचे सरपंच मारुती थिटे, अजय भागवत, संदीप गावडे, श्रीनिवास गावडे, हनुमंतराव दौंडकर तसेच सातगाव पठार गावातील सरपंच, आंबेगाव बाजार समिती संचालक जयसिंग एरंडे व डॉ. ताराचंद कराळे तसेच शेतकरी उपस्थित होते. बैठकीत या प्रश्नी लढा देण्यासाठी कळमोडी प्रकल्प कृती समिती स्थापन करून सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन शासनाला गांभीर्य लक्षात यावे, यासाठी सर्व ग्रामसभांचे ठराव पाठवून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्रित पाठपुरावा करण्याचे ठरले, त्यानुसार सातगाव पठार, खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, गोसासी, वरूडे, वाफगाव व शिरुर तालुक्यातील केंदुर, पाबळ या गावांच्या विशेष ग्रामसभा २५ तारखेपर्यंत घेऊन सर्व गावांची पुन्हा एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अशोक टाव्हरे यांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा...
मागील महिन्यात झालेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर होत असताना खेड, आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही तारांकित प्रश्न वा लक्षवेधी कळमोडी संदर्भात केली नाही, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. थिटेवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत पाबळ, केंदूर येथील नागरिकांची मागणी आहे. या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी अशोक टाव्हरे यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्थेची स्थापना केली असून, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन तातडीने अंदाजपत्रक मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. शासनाने न्याय दिला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दि. १० जानेवारी पासून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे.