पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:10 PM2021-04-26T17:10:01+5:302021-04-26T17:10:32+5:30

नागरिकांची फसवणूक करणा-या मार्केट यार्डातील तीन अडत्यांवर कारवाई

Karnataka mango sold as 'Devgad Hapus' in Pune | पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री

पुण्यात कर्नाटक आंब्याची ' देवगड हापूस' म्हणून विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देपरराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस' या नावाने विकण्याचे धाडस

पुणे: सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील रत्नागिरी, देवगड या भागाबरोबरच कर्नाटकातूनही पुण्यात आंबे दाखल होत आहेत. रसाळ आंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणून त्यांच्या किमतीही जास्त असतात. अशाच परिस्थितीत नागरिकांची फसवणूक करत विक्रेते आंब्यांची अदलाबदल करून विक्री करू लागले आहेत. त्यामध्येच पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून येणार आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये एच.बी बागवान शेड नं.२, नॅशनल फ्रूट शेड नं.३, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं.४ या तीन अडत्याकडून १७,७०० रुपये दंड वसूल केला आहे.

बाजारात आंब्याचा हंगाम बहरला आहे. परंतु अनेक विक्रेते परराज्यातील विविध जातीचे आंबे ‘कोकण हापूस' या नावाने विकण्याचे धाडस करू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.  त्या पार्श्वभूमीवर गरड यांनी बाजारात आंब्याचा व्यापार करणाऱ्या सर्व अडत्यांना सूचना केल्या होत्या. सोमवारी गेट नं. ७ येथील आंबा बाजाराला गरड यांनी भेट दिली. यावेळी काही अडते कर्नाटक येथून येणार आंबा’  कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेटीत कर्नाटक येथील आंबा भरून त्यामध्ये तो विकला जात होता. यामुळे गरड यांनी तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. 


कर्नाटक येथील आंबा ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेट्यामध्ये तो विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड वसुल केला आहे. तसेच दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
                                                                           - मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.
 

Web Title: Karnataka mango sold as 'Devgad Hapus' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.