अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 08:35 PM2017-09-13T20:35:46+5:302017-09-13T20:37:02+5:30
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पुणे, दि. 13 - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी एका कराटे प्रशिक्षकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सागर उर्फ सिद्धेश्वर अभिमान ढोबळे (वय ४३, रा़ अशोक सोसायटी, थेरगाव) असे त्याचे नाव आहे.
याबाबत हकिकत अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी सागर ढोबळेकडे कराटे प्रशिक्षकासाठी जात होती. त्याचा येरवडा येथे क्लास होता. त्याने या मुलीला लीडर बनविले असल्याचे खोटे सांगून तिला कराटेसाठी नवीन कपडे, टी शर्ट वगैरे घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी लैंगिक चाळे, अश्लिल कृत्य केले. आरोपीने तिला खोटी कारणे सांगून मॉलमध्ये पिंपरी येथील एका शाळेमध्ये, डोंगराळ भागात घेऊन गेला होता. या प्रकाराने घाबरुन तिने कराटे क्लास जाणे बंद केले होते. मात्र, या प्रकाराबाबत तिने ताबडतोब कोणाला सांगितले नव्हते.
सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या निर्भया अभियानातंर्गत शाळेत केल्या असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात २३ जून २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पिडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिकांसह चार साक्षीदार नोंदविले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायालयाने पोस्को अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड आणि विनयभंग केल्याबद्दल १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी याप्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामाकाजात पोलीस नाईक प्रकाश भोसले, हवालदार सुधीर चिकणे यांनी सहाय्य केले.
निर्भय अभियानामुळे गुन्हा उघडकीस...
दिल्लीतील निर्भयाप्रकरणानंतर महिला पोलीस अधिकारी शाळा, महाविद्यालयात जाऊन मुलींशी संवाद साधतात. या अभियानांतर्गत मुलींना सक्षम बनविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या येरवडा येथील शाळेत गेल्या होत्या़ त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकूण पिडित मुलीने त्यांना व मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मुलीच्या आईवडिलांना शाळेत बोलवून घेतले. तेथे या मुलीने आईवडिलांसमक्ष संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निर्भया अभियानामुळे हा प्रकार उघडकीस आला होता.