कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याबाबत पोलीस मांडणार राज्य सरकारकडे भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 11:17 AM2020-11-03T11:17:07+5:302020-11-03T11:17:42+5:30
कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात.
पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळे बंद आहेत. आळंदी येथे कार्तिकी वारी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. राज्य सरकारकडे प्रशासनाकडून भूमिका मांडण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिले.
चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठक झाली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डाॅ. अभय टिळक, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चाैधर, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे आदी या वेळी उपस्थित होते.
आळंदी येथे कार्तिकी वद्य अष्टमी ते कार्तिकी अमावस्या दरम्यान कार्तिकी यात्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा ८ ते १४ डिसेंबर दरम्यान हा सोहळा होणार आहे. यात हैबतराव बाबा यांच्या पायरीचे पूजन अष्टमीला झाल्यानंतर यात्रेला सुरवात होते. त्यानंतर ११ डिसेंबरला एकादशी तर १३ डिसेंबरला संजीवन समाधी दिन आहे. तर १४ डिसेंबरला यात्रेची समाप्ती होणार आहे. समाप्तीनिमित्त छबीना काढण्यात येतो.
कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा होणार नसल्यास भाविक व वारकरी यांना सूचना देणे आवश्यक आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे देवस्थानच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारकडे सोहळ्याबाबत भूमिका मांडण्यात येईल. त्यांच्याकडून नियमावली तसेच सूचना प्राप्त होतील त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी या वेळी सांंगितले.