अलंकापुरीत कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांचे स्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:29 PM2019-11-23T13:29:12+5:302019-11-23T13:29:30+5:30
श्री पांडुरंगरायाच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा; इंद्रायणीत पादुकांना स्नान
आळंदी : माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या शनिवारी (दि. २३) लाखो भाविकांच्या उपस्थितीत आळंदीत साजरी होत आहे. यानिमित्त माऊलींची पालखीची नगरप्रदक्षिणा होत आहे. दरम्यान, दशमीदिनी शुक्रवारी (दि. २२) श्री पांडुरंगरायाच्या पादुकांच्या ग्रामप्रदक्षिणेत इंद्रायणी नदीवर श्रींच्या पादुकांना हरिनामगजरात स्नान घालण्यात आले. राज्य परिसरातून अलंकापुरीत आलेल्या भाविकांनी नदीवर स्नानास, तसेच श्रींचे दर्शन व महापूजेस गर्दी केली.
आळंदी यात्रेतील परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात शुक्रवारी (दि. २२) श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य झाला. वीणामंडपात हभप गगुकाका शिरवळकर व हभप धोंडोपंतदादा अत्रे यांच्यावतीने कीर्तनसेवा झाली. धुपारतीनंतर हभप वासकरमहाराज व हभप वाल्हेकरमहाराज यांच्यावतीने हरिनामगजरात कीर्तन झाले. व्यवस्थापक माऊली वीर यांनी दर्शनबारी भरली असून, पुढील बारी भक्ती सोपान पुलावरून पुढे
इंद्रायणी नदीकडील तात्पुरत्या दर्शन बारी मंडपात पोहोचली असल्याचे सांगितले. भागवत धर्मप्रचारक आश्रमात हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे सुश्राव्य
‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या विषयावर प्रवचनसेवेस सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी
प्रवचनास गर्दी केली. भाविकांनी प्रवचनसेवेस उपस्थित राहण्याचे आवाहन पुरुषोत्तममहाराज पाटील यांनी केले आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ही सेवा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...........
आज आळंदीत कार्तिकी एकादशी
४आळंदी मंदिरात शनिवारी (दि. २३) कार्तिकी वारीतील मुख्य भागवत एकादशी साजरी होत असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले. वारकरी संप्रदायात परंपरेने भागवत एकादशी साजरी केली जाते. त्यानुसार आळंदीत २३ नोव्हेंबरला एकादशी साजरी केली जात आहे. यानिमित्त शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे १२ ते ३ या कालावधीत श्रींची परंपरेने पहाटपूजा होणार आहे. यात पवमान अभिषेक व दुधारती, ११ ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात पहाटपूजा होणार आहे. दुपारी एकादशीदिनी फराळाचा महानैवेद्य झाल्यानंतर श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा करण्यात महाद्वारातून बाहेर येईल. त्यानंतर दुपारी हरिहरेंद्र मठाजवळील दर्शनबारीतून पासधारकांची २ ते ६ या वेळेत दर्शनव्यवस्था होईल.
............