कार्तिकी वारी : भाविक-भक्तांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:28 PM2022-11-18T15:28:20+5:302022-11-18T15:30:04+5:30

भाविकांची दर्शनरांग इंद्रायणीच्या पलीकडील दर्शनबारीत पोहोचली

Kartiki Vaari Alankapuri was resounding with the shouts of devotees pune latest news | कार्तिकी वारी : भाविक-भक्तांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली

कार्तिकी वारी : भाविक-भक्तांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली

Next

- भानुदास पऱ्हाड

आळंदी : धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार !

             धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी !!

             धन्य भागीरथी पुण्यभूमी !

             आणिक हो गंगा त्रिवेणी त्या !!

या चरणाप्रमाणे ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२६ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवंचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध ठिकाणांहून पायी वारी करत येत असलेल्या भाविकांच्या दिंड्या तसेच पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आळंदीत स्थिरावत आहेत. भाविकांची दर्शनरांग इंद्रायणीच्या पलीकडील दर्शनबारीत पोहोचली आहे.

तत्पूर्वी, पहाटे तीनला माउलींची नित्यनियमाप्रमाणे पवमान अभिषेक व दूधआरती करण्यात आली. पूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी वीणा मंडपात ह.भ.प. बाबासाहेब महाराज देहूकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. धूपआरतीनंतर वीणा मंडपात ह.भ.प. वासकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री दहानंतर जागराचा कार्यक्रम पार पडला. मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

दरम्यान, ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा हा आनंददायी सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी वारकरी दिंडी, पालखीसह टाळ - मृदंगाच्या गजरात माउलींचा जयघोष करत अलंकापुरीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे पवित्र इंद्रायणीकाठ भाविकांनी गजबजून निघाला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रमांमध्ये वारकरी दंग झाले असून संजीवन सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

ज्ञानोबा - तुकारामांचा जयघोष... आळंदी शहरात दिवसभरात वडगाव रोड, मरकळ रोड, चाकण रोड, भोसरी रोड आदी ठिकाणांहून वारकऱ्यांच्या पायी येत असलेल्या दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश केला. आळंदीत दाखल झाल्यानंतर ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष प्रत्येक वारकरी करत असल्याने संपूर्ण अलंकापुरी दुमदुमून निघाली आहे.

Web Title: Kartiki Vaari Alankapuri was resounding with the shouts of devotees pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.