कार्तिकी यात्रा : आळंदीत देहू फाट्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणांवर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 07:29 PM2022-11-14T19:29:09+5:302022-11-14T19:29:28+5:30

या मोहिमेची कायमस्वरूपी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे...    

Kartiki Yatra Hammer on illegal encroachments on Dehu Phata in Alandi pune latest news | कार्तिकी यात्रा : आळंदीत देहू फाट्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणांवर हातोडा

कार्तिकी यात्रा : आळंदीत देहू फाट्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणांवर हातोडा

Next

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषद हद्दीतील वाढत्या अतिक्रमणांवर आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने धडक कारवाई करत सर्रास बेकायदेशीर अतिक्रमणे जेसीबीच्या सहायाने काढली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१४) देहूफाट्यावर देहू - मोशी रस्त्याशेजारील अतिक्रमणे काढण्यात आली. त्यामुळे तूर्तास तरी शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमण मुक्त होत आहे. या मोहिमेची कायमस्वरूपी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

आळंदी नगरपरिषद हद्दीत दिवसेंदिवस महत्त्वाच्या ठिकाणी, चौकाचौकात तसेच रस्त्यालगतच्या जागेत अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. शहरात आषाढी व कार्तिकी वारीला राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. अशावेळी शहरातील रस्त्यांलगत झालेल्या अतिक्रमणांमुळे त्रास सहन करावा लागतो. विशेषतः कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शहरातील अतिक्रमण मुद्दा गाजला होता. या पार्श्वभूमीवर विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी शहरातील अतिक्रमणे सर्रासपणे काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या.

या अनुषंगाने आळंदी नगरपरिषद, वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाने देहूफाटा परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. रस्त्यालगत फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या असंख्य दुकानांचे शटर, बोर्ड, बांधकाम आदी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. तर रस्त्यावर असलेल्या हातगाड्या, फ्लेक्स, दुकानाचे फलक पालिका कर्मचाऱ्यांद्वारे ट्रॅक्टरमध्ये भरून नेण्यात आले.

दरम्यान देहूफाट्यावर अतिक्रमण काढण्यावरून दुकानदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांत 'तू तू मै मै' झाली. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी आवश्यक अतिक्रमणे सर्रासपणे हटवली. सदरच्या मोहीमेसाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव व  वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पन्नासहून अधिक पोलीस व विशेष पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण धारकांना वारंवार स्वच्छेने अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही अतिक्रमणे काढली जात नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. यात्रा काळात शहरात राहादरीस  अडथळा होईल अशा ठिकाणी कुणीही अतिक्रमण करु नये अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

- अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद

Web Title: Kartiki Yatra Hammer on illegal encroachments on Dehu Phata in Alandi pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.