कर्वे शिक्षण संस्था शुल्कवाढीवर ठाम
By admin | Published: May 24, 2017 04:30 AM2017-05-24T04:30:20+5:302017-05-24T04:30:20+5:30
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी केलेली शुल्कवाढ नियमानुसार असल्याचा दावा करून ती कायम ठेवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेने येत्या शैक्षणिक वर्षासाठी केलेली शुल्कवाढ नियमानुसार असल्याचा दावा करून ती कायम ठेवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. संस्थेने याबाबत विभागीय शुल्क नियंत्रण समितीलाही आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची माहिती संस्थेचे सचिव पी. व्ही. श्रीनिवास शास्त्री यांनी दिली.
शहरातील काही शाळांनी मनमानी पद्धतीने शुल्कवाढ केल्याप्रकरणी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला होता. त्यानंतर तावडे यांनी काही शाळांच्या तक्रारींबाबत मुंबईत शाळा प्रतिनिधी व पालकांसोबत चर्चा केली होती. त्यामध्ये महर्षी कर्वे संस्थेच्या शाळेचाही समावेश होता. या शाळेनेही अवाजवी शुल्कवाढ केल्याची तक्रार काही पालकांनी शिक्षण विभागाकडे केली होती. याबाबत संस्थेकडून विभागीय समितीला शुल्कवाढ नियमानुसार असल्याची कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे शास्त्री यांनी सांगितले. काही संघटनांकडून शुल्कवाढीबाबत पालकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात आले होते. संस्थेने केवळ १५ टक्के शुल्कवाढ केली आहे. हे समितीच्याही निदर्शनास आणून देण्यात आले. पालकांचाही गैरसमज दूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनीही ही शुल्कवाढ मान्य केली. शुल्कवाढ कायम राहील, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.