पुण्यातील कर्वे रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार; उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:13 PM2022-02-08T21:13:00+5:302022-02-08T21:13:36+5:30

पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला

karve road in pune will soon breathe a sigh of relief the flyover will be open for traffic | पुण्यातील कर्वे रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार; उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

पुण्यातील कर्वे रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार; उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Next

पुणे : पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला. येत्या १५ दिवसांत उड्डाणपूल पूर्णत्वास जात असून २३ फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे येऊ शकणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी खुला होऊन कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती.

दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर महापौर मोहोळ म्हणाले, 'नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस जात असल्याचे मनस्वी समाधान आहे. मेट्रोकडून पुणे महापालिकेच्या ताब्यात हा उड्डाणपूल आल्यावर कोणत्याही विलंबाशिवाय वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असल्याने याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

याबाबत महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, 'उड्डाणपूल जवळपास तयार झाला असून ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ किरकोळ स्वरूपाची कामे झाले असून त्यात एक्सपांशन ज्वाइंट, पथदिवे, रंगकाम आणि इतर कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या १५ दिवसात पूर्ण केली जात आहेत. त्यानंतर उड्डाणपुलाचे हस्तांतरण महापालिकेकडे केले जात आहे'.

Web Title: karve road in pune will soon breathe a sigh of relief the flyover will be open for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.