कर्वेनगर मुख्य चौक : महिला स्वच्छतागृहाची झाली कचराकुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:11 AM2019-03-19T03:11:42+5:302019-03-19T03:16:14+5:30
पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून महिलांच्या सुविधेसाठी शहरात सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधली. कर्वेनगर येथील मुख्य चौकातील महिला स्वच्छतागृहांचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येत आहे.
पुणे - पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून महिलांच्या सुविधेसाठी शहरात सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधली. कर्वेनगर येथील मुख्य चौकातील महिला स्वच्छतागृहांचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या सार्वजनिक आरोग्याची कोणतीही काळजी पालिकेला नाही असे दिसते. स्वच्छतागृह केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी बांधली जात आहेत का महिलांच्या सुविधेसाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मुख्य चौकात असलेल्या या स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता आहे. दुर्गंधीयुक्त पाणी सगळीकडे पसरलेले आहे. कचरा टाकल्यामुळे संडास तुंबलेले आहेत. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सर्वत्र पडलेला दिसतो.
स्वच्छतागृहाच्या बऱ्याच खोल्यांत पाणी नाही. रात्रीच्या वेळेस आवश्यक विजेची व्यवस्था दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूलाच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. हीच स्थिती शहरातील बहुतांश स्वच्छतागृहांची झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. कर्वेनगर भागात दोन महिला महाविद्यालये व शाळा आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींची ये-जा असते. स्वच्छतागृहांच्या समोरच पीएमपीचा बसथांबा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. अस्वच्छ स्वच्छतागृहांचा त्रास प्रवाशांनादेखील होत आहे. प्रवाशांनीदेखील स्वच्छतागृह वापरण्याजोगे स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
यावरून महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत महापालिका प्रशासन गंभीर नाही, हेच दिसून येत आहे. त्याबरोबरच स्वच्छतागृहांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्वेनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महानगरपालिकेने स्वच्छतागृह बांधले. त्यावर पालिकेचे लाखो रुपये खर्च केले. मात्र नियमित देखभाल आणि दुरुस्ती न केल्यामुळे स्वच्छतागृहांची ही अवस्था झाली आहे. यावर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. स्वच्छतागृहाची साफसफाई केल्यास याचा वापर होईल; अन्यथा स्वच्छतागृहाची कचराकुंडी होईल.
महापालिकेने स्वच्छतागृहे बांधली; परंतु स्वच्छत़ागृहांची योग्य देखरेख केली नाही. त्यामुळेच स्वच्छतागृहांची अशी बिकट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांच्या परिसरात कचºयाचे साम्राज्य झाले आहे. मद्यपी येथे दारूच्या बाटल्या फेकतात. पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी.
- एक महिला
कर्वेनगरच्या पीएमपी बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेता येथील महिला व पुरुष स्वच्छतागृहांची साफसफाई करणे गरजेचे आहे.
- प्रतीक ठाकरे,
प्रवासी
दिवसातून ३ वेळा स्वच्छतागृह साफ करण्यात येतात. सकाळी ६ वाजल्यापासून कर्मचारी स्वच्छतागृह साफ करण्याचे काम करतात. संध्याकाळच्या वेळी स्वच्छता करण्यास आम्ही थोडं कमी पडतो आहे. ज्या स्वच्छतागृहाची स्वच्छता राहिली असेल, ती लवकर करून स्वच्छतागृह सुरू करण्यात येईल.
- गणेश सुनोने, सहायक आयुक्त,
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय