जुन्नरच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्येही खुलू लागले ‘कास पठार’

By Admin | Published: September 29, 2016 05:53 AM2016-09-29T05:53:18+5:302016-09-29T05:53:18+5:30

पर्यटन, पर्यावरण आणि अफलातून लाभेले नैसर्गिक सौंदर्य यामुळे पहिल्यापासूनच पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला जुन्नर तालुका म्हटले, की मनाला एक प्रकारे

'Kas Plateau' opened in Junnar's Sahyadri Hills | जुन्नरच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्येही खुलू लागले ‘कास पठार’

जुन्नरच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्येही खुलू लागले ‘कास पठार’

googlenewsNext

खोडद : पर्यटन, पर्यावरण आणि अफलातून लाभेले नैसर्गिक सौंदर्य यामुळे पहिल्यापासूनच पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला जुन्नर तालुका म्हटले, की मनाला एक प्रकारे आनंदाचा सुखद धक्का लागून जातो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि खऱ्या अर्थाने नैसर्गिक स्वर्ग म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सध्या विविध रंगीबेरंगी रानफुलांच्या रंगसंगतीने हा परिसर बहरून गेला आहे. जुन्नरच्या नैसर्गिक सौंदर्यात या रानफुलांनी खऱ्या अर्थाने रंग भरण्याचे काम केले आहे.
श्रावणानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना ओढ लागते ती कास पठाराची...! इथलं सृष्टीसौंदर्य प्रत्येकावर भुरळ घालते.
ऊन आणि पावसाचा खेळ सुरू झाला, की या पठारावर विविध रंगांची फुलं उमलू लागतात. लाल, निळा, पिवळा असे अनेक रंग हे पठार दोन महिन्यांच्या काळात घेते. हा पुष्पसोहळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक आणि अभ्यासक दरवर्षी कासला जातात.
कास निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे. यात शंका नाही. पण अशीच काही पठारे सह्याद्रीमध्ये आणखी काही ठिकाणी आहेत. अर्थात ती तितकी अवाढव्य किंवा तशीच नाहीत पण फुलांचे ताटवे आणि रंग बदलणारे जमिनींचे तुकडे सह्याद्रीत अन्यत्र काही ठिकाणी पाहायला मिळतात. जुन्नरच्या पश्चिम भागातदेखील असे फुलांचे ताटवे श्रावणानंतर फुलू लागतात.
येथील बहुतांश फुलं ही क्रमाक्रमाने फुलत असल्याने सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात जुन्नरच्या या पठारांना ‘कास’चं स्वरूप येतं. नजर टाकावी तिकडे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुललेले दिसतात. जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये सध्या अशा प्रकारच्या फुलांचे ताटवे फुलताना दिसत आहेत. (वार्ताहर)

खोडदचे वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले, की जुन्नरच्या पश्चिमेकडील पठारांवर सोनकी, तेरडा, गेंद, कारवी, जांभळी मंजिरी, पंद, दवबिंदू, अबोलीमा, नभाळी, विविध आॅर्किड्स, तुतारी, युट्रिकुलारिया, अग्निशिखा, कावळा, बरका, लहान कावळा, बोरपुडी, बेचका, गोधडी, किलवर, जांभळी चिरायत, नीळकंठ, काळमाशीसारख्या वनस्पती प्रामुख्याने दिसतात. सोनकी फुलू लागली, की पठारांना पिवळा रंग येतो, पुढे युट्रिकुलारिया आणि जांभळी मंजिरीसारख्या वनस्पती पिवळा रंग झाकून जांभळा करतात आणि हा बदलणारा रंग पाहणं अतिशय सुखावह असतं.

Web Title: 'Kas Plateau' opened in Junnar's Sahyadri Hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.