Kasba By Election | कसब्यात आजपासून १७०० पोलिस तैनात; ९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:38 AM2023-02-25T09:38:35+5:302023-02-25T09:40:02+5:30
मतदानाच्या दिवशी २७० मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहाणार
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान होत आहे. त्यासाठी आजपासून (शनिवारी) कसब्यामध्ये १७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यात शहर पोलिस दलातील एक हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलातील पाचशे पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलातील शंभर पोलिसांचा समावेश आहे.
मतदानाच्या दिवशी २७० मतदान केंद्रावर पोलिसांची करडी नजर राहाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून ९ मतदार केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्या केंद्रांकडेही पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलासारख्या विविध १३ पथकांच्या सुमारे शंभर तुकड्या नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिली.
कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एकच दिवस शिल्लक आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पुणे पोलिसांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, रेस्टॉरंट, गाडे, टपऱ्या आणि सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी काढला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने १८ जानेवारीपासून लागू करण्यात आलेली आचारसंहिता २ मार्च रोजी निकाल जाहीर होईपर्यंत लागू असेल.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या कार्यक्षेत्रात खडक, फरासखाना, विश्रामबाग, समर्थ व दत्तवाडी अशा पाच पोलिस स्टेशन येतात. ७६ इमारतींमध्ये २७० मतदान केंद्र असून, ९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यावेळी १३ पथकांच्या सुमारे १०० तुकड्या तसेच पोलिस आयुक्त व पोलिस सहआयुक्तांसह २ अपर पोलिस आयुक्त, ५ पोलिस उपायुक्त, ५ सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ९० सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ५ सीपीएमएफ कंपन्या (प्रत्येकी १००) ७०० कर्मचारी, ३०० होमगार्ड आणि १ एसआरपीफ कंपनी यांचा बंदोबस्तात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून २७८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
कसबा पोटनिवडणूक काळात २७८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय प्रोव्हिबिशन ॲक्ट केसेस अंतर्गत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. ११९ जणांकडून शस्त्रे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नाकेबंदीदरम्यान ३१ लाख १८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
...ही नऊ केंद्रे संवेदनशील
राजमाता जिजाबाई प्रायमरी शाळा (२) , अब्दुल करीम हुसेन अत्तार कोर्टवाले शाळा, शेठ नाथुभाई हुकुमचंद गुजराथी शाळा (२), पुणे महापालिका शाळा विनोबा भावे विद्या मंदिर, सुंदरलाल राठी सेवा सदन हायस्कूल, गोपाळ हायस्कूल आणि आदर्श विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा ही नऊ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.