Kasba By Election | देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग; रवींद्र धंगेकर यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:42 AM2023-03-02T08:42:39+5:302023-03-02T08:43:48+5:30
मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार...
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत २३ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणात भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना म्हटले की, ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे.’ या जोडीलाच त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करून म्हटले की, काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.