Kasba By Election | पूर्व कसब्यात उत्साह, तर पश्चिम कसब्यात निरूत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:46 AM2023-02-27T10:46:54+5:302023-02-27T10:47:06+5:30
दुपारी चारनंतर वाढला मतदारांचा ओघ...
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पूर्व परिसरातील गुरुवार पेठ, रविवार पेठ, घाेरपडे पेठ, कासेवाडी, दत्तवाडी यासह अन्य वसाहतीत मतदानासाठी सकाळपासून उत्साह दिसून येत हाेता. तर पश्चिम भागातील शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि कसबा पेठ या मध्यवस्तीतील पेठांमध्ये आणि मेहुणपुरा तसेच अन्य पश्चिम भागात मतदानासाठी निरुत्साह दिसत हाेता.
सकाळी सात ते दुपारी अकरापर्यंत झालेल्या मतदानातील या आकडेवारीवरून नंतर नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नव्याने मोर्चेबांधणी केली व मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवारची सुटी, पोटनिवडणूक व उन्हाचा वाढता तडाखा यामुळे त्यांना मतदारांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी टाकण्यात आलेल्या बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी होती. मात्र, मतदार दिसत नव्हते. सकाळी सात ते नऊ या वेळात फारसे मतदान झालेच नाही. त्यानंतरही कामासाठी घराबाहेर पडावे लागणाऱ्या मतदारांचीच संख्या जास्त होती. कसबा पेठ, रविवार पेठ या उमेदवारांच्या राहत्या परिसरातही हेच चित्र होते. दुपारी अकरापर्यंत मतदानाचा वेगच सर्व ठिकाणी कमी होता. कमी मतदान झाले तर त्याचा थेट परिणाम विजयावर होईल, हे लक्षात घेऊन नेत्यांनी आपापल्या हक्काच्या परिसरातील मतदारांना मतदान करण्यास प्राेत्साहित करण्यासाठी कार्यकर्त्यांचे ग्रुप तयार करण्यात हाेते. त्यानंतर कसबा, नारायण, सदाशिव या पेठांमध्ये मतदानाचा जोर वाढू लागला.
दुपारी चारनंतर वाढला मतदारांचा ओघ
दुपारी एक ते चारदरम्यान मतदानाचा वेग पुन्हा मंदावला. तरीही पूर्व भागात मतदान चांगले होत होते. काही केंद्रांमध्ये रांगा लागल्या होत्या. चारनंतर तर पूर्व भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर गर्दी होऊ लागली. यावेळी मतदानाची मुदत सायंकाळी सहापर्यंत होती. नेहमी ती पाच वाजेपर्यंत असते. त्यामुळेही मतदार थोडे निवांत होते. पूर्व भागातील काही मतदान केंद्रांमध्ये वेळ संपण्याच्या आधी मतदान केंद्रात आलेल्या मतदारांचा मतदान सहानंतरही सुरू होते.
कार्यकर्ते जाेशात मात्र मतदार आळसात
मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांची त्या त्या परिसरात नियुक्ती केली हाेती. त्याप्रमाणे मतदारांना घराबाहेर पडण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांकडून सुरू हाेते. मात्र, रविवारच्या सुटीमुळे मतदार घराबाहेर पडण्याचा आळस करत होते. येतो, आवरतो, निघतो अशीच उत्तरे त्यांना मिळत होती. संपूर्ण मतदारसंघात कमी- अधिक फरकाने हाच प्रकार दिसत होता. एरवीच्या निवडणुकांमध्ये सकाळी लवकर येऊन मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त असते, तसे दिसत नव्हते.