Kasba By Election: पावणेतीन लाख मतदार अन् २७० मतदान केंद्रे; निवडणूक यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:49 AM2023-02-25T11:49:50+5:302023-02-25T11:50:02+5:30
दोन लाख ७५ हजार ४२८ इतके मतदार, २७० मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे दोन लाख ७५ हजार ४२८ इतके मतदार, २७० मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी १२०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतदानासाठी ७५६ मतदान यंत्रे, ३७८ कंट्रोल युनिट व ४०५ व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवली आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पीएमपीकडून ४३ मोठ्या बस, सात छोट्या बस, १२ जीप देण्यात आल्या आहेत.
पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजता संपला. कसब्यातून निवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात आहे. या निवडणुकीसाठी दोन लाख ७५ हजार ४२८ इतके मतदार २७० मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक तो बंदोबस्त तैनात केला आहे.
कसबा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक ते मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांवर चित्रीकरण, भरारी पथके आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती अशी चोख तयारी निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. मतदानासाठी सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेवटचे आणि तिसरे प्रशिक्षण शनिवारी (दि. २५) गणेश कला, क्रीडा मंदिर येथे होणार आहे. या प्रशिक्षणानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना ७५६ मतदान यंत्रे, ३७८ कंट्रोल युनिट व ४०५ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी रवाना होणार आहेत.
कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पीएमपीकडून ४३ मोठ्या बस, सात छोट्या बस, १२ जीप दिल्या आहेत, अशी माहिती कसब्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के यांनी दिली.
दृष्टिक्षेपात कसबा मतदारसंघ
एकूण मतदार - २,७५,४२८
पुरुष मतदार - १,३६,८७३
महिला मतदार - १,३८,५५०
तृतीयपंथी मतदार - ५
अनिवासी भारतीय मतदार - ११४
दिव्यांग मतदार - ६,५७०
८० वर्षांवरील मतदार - १९,२४४
मतदान केंद्र - २७०
संवेदनशील मतदान केंद्र - ९
चित्रीकरण करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राची संख्या - २७
मतदानासाठी आवश्यक कर्मचारी - १,२००
क्षेत्रीय अधिकारी- २५
सूक्ष्म निरीक्षक - ११
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी
- Voter Helpline App
- Pwd App (दिव्यांगांसाठी)
- www.ceo.maharashtra.gov.in
- https://electoralsearch.in