Kasba By Election | ‘हरीपत्ती, लालपत्ती’च्या दर्शनानंतर मतदारांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:00 AM2023-02-27T11:00:26+5:302023-02-27T11:00:54+5:30
‘हरीपत्ती’ आणि ‘लालपत्ती’चे दर्शन झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याची जोरदार चर्चा...
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून अर्थपूर्ण चर्चा जोरात असतानाच भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदानाच्या दिवशी या मतदार संघातील विविध वस्ती भागांमध्ये ‘हरीपत्ती’ आणि ‘लालपत्ती’चे दर्शन झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याची जोरदार चर्चा आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाच्या अगोदर भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा व्हिडीओ जारी केला होता. श्री कसबा गणपतीसमोर धरणे आंदोलनही केले होते. त्यातच मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री गंज पेठेत एका महिलेने पैसे घेतले नाही म्हणून भाजपच्या माजी नगरसेवकाच्या भावाने मारहाण केली होती. त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पैसे वाटप केल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. मतदान संपण्यासाठी अवघा अर्धा तास उरल्यानंतर प्राचार्य विनोबा भावे स्कूल, गंज पेठ मतदान केंद्रावर तुफान गर्दी झाली होती. वस्ती भागात हरीपत्ती आणि लालपत्तीचे दर्शन झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याची जोरदार चर्चा आहे.
मतदानासाठी येऊ नये म्हणून हरीपत्तीचे वाटप
कसबा पोटनिवडणुकीत मतदानाला येऊ नये, यासाठी काही भागात हरीपत्तीचे वाटप करण्यात आले. निवडणुकीत मतदानाला येण्यासाठी पैसे वाटल्याचे सांगितले जाते. पण या निवडणुकीत प्रथमच मतदानासाठी येऊ नये म्हणून हरीपत्तीचे वाटप केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.