Kasba By Election | कसब्यातील निकालाचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 10:50 AM2023-03-03T10:50:08+5:302023-03-03T10:50:40+5:30
आगामी काळात शहर भाजपमध्ये मोठी उलथापालथ होणार असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विजयी घोडदौडीला रोखता येऊ शकते याबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे. या मतदारसंघातील सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर आता भाजपमधील पालिकेतील इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. आगामी काळात शहर भाजपमध्ये मोठी उलथापालथ होणार असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर या पराभवाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कसबा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५, १७, १८ हे संपूर्ण तर १६, १९ आणि २९ यांचा काही भाग येतो. या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ हजार ७५६ मतदार आहेत. आतापर्यंत भाजपने या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १५ मधील भागातून नगरसेवक झालेल्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली आहे. हेमंत रासने यांना उमेदवारी देताना प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेवक हा एक निकष लावला होता.
कसब्यात २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४१ हजार ७७७ मतदान होऊन त्यापैकी सुमारे ६८ टक्के मते भाजपला मिळून २१ हजार २९ मतांचे मताधिक्य मिळविले होते. मात्र या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये हेमंत रासने यांना आघाडी मिळाली. पण मुक्ता टिळक यांना मिळालेले २१ हजार मताधिक्य मिळविण्यात रासने कमी पडले. या प्रभागातही धंगेकर यांना आघाडी मिळाली नाही. पण चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे धंगेकर हे मतमोजणीत सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवू शकले. या मतदारसंघातील सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर आता भाजपमधील पालिकेतील इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यात अनेकांचा पत्ता कट होणार आहे.
भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांची राजकीय कारकीर्द टांगणीला
महापालिकेत पाच वर्षे एकहाती सत्ता आणि खासदार, पाच आमदार, असा मोठा फौजफाटा असतानाही बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे शहर भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांची राजकीय कारकीर्द टांगणीला लागली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील , निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, धीरज घाटे यांच्यासह माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. मात्र,तरीही शहर भाजपला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर पक्षसंघटनेची बांधणीही किती कमकुवत आहे आणि स्थानिक पदाधिकारी, नेत्यांची जनतेशी नाळ कशी तुटलेली आहे, हेही या निवडणुकीने अधोरेखित केले.
महापौर, स्थायी अध्यक्षपद, सभागहनेतेपद , १२ नगरसेवक असताना पराभव
कसबा विधानसभा मतदारसंघात १८ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक भाजपचे आहेत. पालिकेतील पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात कसबा पेठ मतदारसंघाला अडीच वर्षे महापौरपद, तीन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि तब्बल दोन वेळा सभागृह नेतेपद आणि १२ नगरसेवक असताना बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपचा पराभव झाला. त्यामुळे शहर भाजपमध्ये उलथापालथ होणार आहे.