Kasba bypoll, Mukta Tilak son: मुक्ता टिळकांच्या मुलाला तिकीट न देणं भोवलं का? BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:05 PM2023-03-02T16:05:41+5:302023-03-02T16:06:25+5:30
३० वर्षांपासून सत्ता राखलेला कसब्याचा गड भाजपाच्या हातून निसटला..
Kasba Bypoll Result, Mukta Tilak son Kunal: पुण्यातील कसबा आणि चिंचवड अशा दोन ठिकाणी पोटनिवडणुकासाठी रविवारी मतदान झाले. त्याचा निकाल आज हाती आला. दोन पैकी एका ठिकाणी भाजपाचा तर दुसऱ्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. भाजपाचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तेथे भाजपाने विजय मिळवला. कसब्यातदेखील मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनाने तेथील जागा रिक्त झाली होती. त्याजागी भाजपाने त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला उमेदवारी न देता, हेमंत रासने यांना मैदानात उतरवले. पण तेथे भाजपाचा पराभव झाला. या निकालानंतर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणाल टिळकला उमेदवारी न देण्याचे कारण सांगितले.
"मुक्ता टिळक या पुण्याच्या आणि कसब्याच्या मतदारांच्या लाडक्या होत्या. त्यांचे निधन झाल्याने कसब्यातील सर्वसामान्य जनतेलाही दु:ख झाले होते. पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला आम्ही भाजपातर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होते. कुणाल टिळक हा वयाने अजूनही लहान आहे. त्यातच त्यांच्या परिवारातून त्यांनी, आम्हाला तिकीट हवंच आहे, असे अजिबात हट्ट धरला नव्हता. हेमंत रासने यांनीही खूप काम केलं असल्याने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला गेला. पण रविंद्र धंगेकर यांच्याबद्दल सहानुभूती असल्याने हा निकाल लागला," असे वाबनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
"आमचा गड अजिबातच उद्ध्वस्त झालेला नाही. गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्या मतदारसंघातून लढत होते आणि पराभूत होत होते, तेव्हा त्यांचा गड उद्ध्वस्त झाला नव्हता का? त्या-त्या वेळी निवडणुकीत नक्की काय परिस्थिती आहे त्यावर गोष्टींचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार मतदारांचा कल दिसून येतो. रविंद्र धंगेकर यांनी याआधीही दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांना काही अंशी मतदारांची सहानुभूती मिळत होती. आमचा उमेदवार पहिल्यांदाच लढला होता. त्यामुळे हा महाविकास आघाडीचा विजय आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. देशाच्या राजकारणात काँग्रेसचा सुपडा साफ होतोय. आम्ही कसब्यातील पराभवाचे चिंतन नक्कीच करू पण काँग्रेसनेही त्यांच्या देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे," असे वाबनकुळे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ता टिळक हा आमदार होत्या. त्यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यात भाजपाच्या पदरी अखेर निराशा आली. गेली ३० वर्षे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. रविंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले.