कसबा, चिंचवड पोटनिवडणूक | उमेदवारांची संख्या वाढली, आणखी ७०० मतदान यंत्रे मागविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:07 PM2023-02-11T13:07:27+5:302023-02-11T13:09:22+5:30
पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट...
पुणे : कसबा व चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता निवडणूक आयोगालाही अतिरिक्त मतदान यंत्रांची मागणी करावी लागली आहे. त्यासाठी कोल्हापूर येथून आणखी ७०० मतदान यंत्रे मागविण्यात आली असून शनिवारपर्यंत (दि. ११) उपलब्ध होणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
कसबा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर १६ उमेदवार निवडणूक रिंगणार उरले आहेत. त्यामुळे येथे आता प्रत्येक मतदान केंद्रात दोन मतदार यंत्रांची गरज भासणार आहे. तसेच चिंचवडमध्येही २८ उमेदवार रिंगणात असून येथेही मतदान केंद्रात दोन यंत्रे लावावी लागणार आहेत. उमेदवारांच्या संख्येत नोटाचाही समावेश करण्यात येतो. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन यंत्राची आवश्यकता आहे. यापूर्वी या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांमिळून १ हजार ६६४ मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट १ हजार ६७१ तर १ हजार ६२० व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवली आहेत. मात्र, आता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने आणखी ७०० मतदान यंत्रांची गरज भासली आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रांची प्राथमिक तपासणी तसेच संगणकीय सरमिसळ करण्यात आली आहे. ठरलेल्या नियोजनानुसार ही यंत्रे शनिवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर येथून येणाऱ्या ७०० यंत्रांचीही प्राथमिक तपासणी व सरमिसळ करून ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.