‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:50 PM2024-11-16T12:50:14+5:302024-11-16T12:56:52+5:30

“देशाला ॲक्सिडेंटल पीएम मिळाला, तसाच कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचारसभेत केली.

Kasba got an MLA like an accidental PM - devendra fadnavis | ‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला

‘ॲक्सिडेंटल पीएमप्रमाणे कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला’ – फडणवीसांचा टोला

पुणे: “देशाला ॲक्सिडेंटल पीएम मिळाला, तसाच कसब्याला ॲक्सिडेंटल आमदार मिळाला. १८ महिन्यांत त्यांनी काय केले ते सांगत नाहीत,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील प्रचारसभेत केली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा कसबा मतदारसंघात पार पडली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

सभेत फडणवीस म्हणाले, “विद्यमान आमदारांचे काम कमी, दंगे जास्त. काम कमी, नाटकं जास्त. त्यांना रंगभूमीवर नेलं तर ‘तो मी नव्हेच’ची भूमिका फार चांगली करतील. त्यांच्यावर जास्त बोलणार नाही. २०१४ नंतर पुण्याच्या विकासाला गती दिली. देशात व राज्यात एकाच सरकारमुळे कामे सुरू झाली. आता मेट्रोचा विस्तार होत आहे. पीएमपीएलसाठी इलेक्ट्रिक बसेस आणल्या. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस असणारी ही महापालिका ठरली. देशातील सर्वांत मोठे मल्टिमोडल हब सुरू केले. अत्याधुनिक सिग्नल, चांदणी चौक आणि पुण्याचा रिंगरोड मी मुख्यमंत्री असताना लाईन आउट केला. १०० किलोमीटरपेक्षा मोठ्या परीघाच्या महामार्गामुळे पुण्यातील रस्ते श्वास घेतील,” असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आमचे सरकार गती आणि प्रगतीचे सरकार आहे. मध्यंतरीचे सरकार स्थगितीचे सरकार होते,” अशी टीका करून फडणवीस पुढे म्हणाले, “विकसित भारत, विकसित महाराष्ट्रासाठी अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांचा विकास करायचा, हा मोदींनी दिलेला मंत्र आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यासाठीच आहे. या योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ कोर्टात गेले, पण कोर्टाने त्यांना चपराक दिली,” अशी टीका सुद्धा फडणवीस यांनी केली.

कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषणमुक्त कसब्यासाठी मास्टर प्लान - हेमंत रासने

हेमंत रासने म्हणाले, “कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषणमुक्त कसब्यासाठी मास्टर प्लान तयार करणार आहे. ही कामे पुढील काळात मार्गी लावणार असून १८ महिन्यांपूर्वींच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने खचलो नाही. दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केले. ५० हजार  नागरिकांबरोबर संपर्क केला.”

यावेळी श्रीमती त्रिभुवन, ॲड. मंदार जोशी, सुधीर कुरुमकर, कुणाल टिळक, गौरव बापट आणि दीपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Kasba got an MLA like an accidental PM - devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.