Kasba Peth By-Election | कसब्यात हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 09:45 PM2023-02-10T21:45:36+5:302023-02-10T21:50:35+5:30
महायुतीचे हेमंत रासने यांची महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार...
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशी आप आणि संभाजी बिग्रेडसह पाचजणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीचे हेमंत रासने यांची महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
कसबा पोटनिवडणुकीतील अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसमधून बंडखोरी केलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाराष्ट्रातील पोटनिवडणुका न लढवण्याचा आम आदमी पार्टीने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाचे किरण केद्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
संभाजी बिग्रेडचे अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. संभाजी ब्रिगेडची शिवसेनेशी युती आहे. त्यामुळे शिवसेनेचे सचिन आहिर यांनी संभाडी ब्रिगेडच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी बिग्रेडने शिवसेनेच्या विनंतीला मान देऊन कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे. महायुतीचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. आता प्रचाराचा जोर वाढणार आहे.
आनंद दवे यांची उमेदवारी कायम
हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आम्ही निवडणूक जिंकण्यावर ठाम असून अर्ज मागे घेण्याचा विचार कधीच केला नव्हता, असे आनंद दवे सांगितले.