काश्मीरच्या मुलींनी क्रिकेटमध्ये पुण्याला हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:08+5:302021-02-14T04:12:08+5:30
पुणे : अनंतनागच्या महिला क्रिकेट संघाने प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात पुण्याच्या मुलींना पराभूत केले. काश्मीरच्या या खेळाडूंनी ‘पुणे ११’ संघाला ...
पुणे : अनंतनागच्या महिला क्रिकेट संघाने प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात पुण्याच्या मुलींना पराभूत केले. काश्मीरच्या या खेळाडूंनी ‘पुणे ११’ संघाला निर्धारित २० षटकांत ८७ धावांत रोखले. मात्र अनंतनागची कर्णधार रूबियाने एकटीने नाबाद पन्नास धावा ठोकत तेराव्या षटकातच पुण्याला हरवले.
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून महिला क्रिकेट संघ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आला आहे. शनिवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजता नेहरू क्रिकेट स्टेडिअमवर पुण्याच्या महिला संघाविरोधात त्यांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
असीम फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या सामन्यात पाहुण्या काश्मिरी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून मेजर जनरल संदीप भार्गव, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त), भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेली महिला क्रिकेटपटू स्नेहल प्रधान, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, गिरीश कुलकर्णी व महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून रूबिया सईद व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोनक जहानला गौरविण्यात आले. पुण्याच्या संघाला मेजर जनरल संदीप भार्गव यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. सर्व खेळाडूंना सामन्यात सहभागी झाल्याबद्दल गौरविण्यात आले. “खेळाच्या माध्यमातून मने जोडली जातात. मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे खेळला जाणारा खेळ मनातल्या भिंती पाडून मैत्रीचे पूल बांधण्याचे काम करू शकतो. म्हणूनच हा दौरा आयोजित केला,” असे ‘असीम’चे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले.