काश्मीर हा भारताचा पूर्वापार अविभाज्य भागच :
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:00 AM2019-06-23T07:00:00+5:302019-06-23T07:00:04+5:30
'काश्मीर’ म्हटलं की फक्त बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, जवानांवर हल्ला हेच ऐकायला मिळतात..
अपवाद वगळता एकाही भारतीय नागरिकाला काश्मीरचा इतिहास फारसा माहिती नाही. पुण्यातील काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘जोनराजकृत राजतरंगिणी’या पुस्तक प्रकाशनानिमित्ताने त्यांच्याशी ’लोकमत’ ने संवाद साधला.
-नम्रता फडणीस
* काश्मीरचा मूळ इतिहास काय आहे?
- काश्मीर हा इतिहासापासूनच भारताचा अविभाज्य भाग आहे.कल्हणाची धुतराष्ट्र राजतरंगिणी हा संस्कृतमधील काश्मीरचा इतिहास भारतामधला अधिकृत इतिहास आहे. हे ब्रिटीशांनी आणि अभ्यासकांनी देखील मानले आहे. हे जर सत्य मानलं तर काश्मीरचा इतिहास हा महाभारतकालापासून सुरू होतो. काश्मीरमध्ये साडेतीनशे वर्ष हिंदू राजवट होती. तोपर्यंत राजे, कवी,कलावंत यांच्यामध्ये आदानप्रदान होत होते. हिंदू राजवट संपून मग मुस्लिम राजवट आली. त्यामुळे काश्मीर भारताचा भाग होता किंवा नव्हता याचा वेगळा पुरावा असण्याची गरजच नाही.
* काश्मीरमधील धार्मिक इतिहास काय सांगतो?
- काश्मीर मध्ये मूळ वैदिक धर्माबरोबरच बौद्ध धर्मही होता. त्यानंतर इस्लाम धर्म आला. काश्मीरमधील हा इस्लाम भारतीय इस्लाम आहे. जे जे नवीन आले ते लोकांनी स्वीकारले. ‘काश्मिरीयत’ म्हणजे काय तर वैदिक, जैन, बौद्ध आणि इस्लाम धर्माची सरमिसळ आहे. याच रसायन म्हणजे काश्मीर आहे. प्रत्येक धर्म, संस्कृती आणि विचार वेगळा आहे. 1947 नंतर भारताची फाळणी झाली. तेव्हा काश्मीर मुस्लिम बहुल होते. पण फाळणीनंतर काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या नाहीत. थोडक्यात सामान्य जनतेमध्ये धार्मिक ध्रृवीकरण फारसे झालेले नाही. पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावण्यात आले त्यांच्यावर अत्याचार झाले हा काश्मीरवरचा काळा डाग आहे. पण आजही तिथे पंडित आणि मंदिरे आहेत.
* काश्मीरच्या प्रश्नाकडे पाहाण्याचा तिथल्या समाजाचा दृष्टीकोन कसा आहे?
- या प्रश्नात राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक राजकारण गुंतलेले आहे. काश्मिरी मुसलमान मंदिरात पण जातात घरात गणपती पण बसवतात. समाजात ज्याप्रमाणे वेगवेगळे घटक असतात. तसेच तिथेही बंडखोरी, विद्रोह आहे. पाकिस्तानचा झेंडा कुणी तरी फडकवत असेलही. पण अजूनही 80 टक्के काश्मिरी जनता ही भारताच्या बाजूने आहे तर काहींना स्वतंत्र काश्मीर हवा आहे.
* इतिहासाच्या मांडणीतून गोष्टी साध्य होईल असे वाटते का?
-आजपर्यंत शाळांमध्ये काश्मीरचा इतिहास कधीही शिकवला गेलेला नाही. काश्मीरचा पहिला ललितादित्य नावाचा राजा होता.ज्याचे तुर्कस्थानपर्यंत राज्य होते. सातव्या-आठव्या शतकापर्यंत त्याची राजवट होती. काश्मीरशी जोडल्या गेलेल्या गोष्टींची किमान माहिती असायला हव्यात.