काश्मीरला हवे आहे देशाचे प्रेम
By admin | Published: December 21, 2015 12:31 AM2015-12-21T00:31:09+5:302015-12-21T00:31:09+5:30
काश्मीरसाठी कोणीच काही सकारात्मक कार्य केलेले नाही. काश्मीर हा भारताचा अतूट अंग आहे. काश्मीरच्या लोकांना देशाच्या प्रेमाची गरज आहे.
पुणे : काश्मीरसाठी कोणीच काही सकारात्मक कार्य केलेले नाही. काश्मीर हा भारताचा अतूट अंग आहे. काश्मीरच्या लोकांना देशाच्या प्रेमाची गरज आहे. सर्वांनी मिळून त्यांना प्रेम दिले, तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल, असे मत जम्मू-काश्मीर भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. हिना भट यांनी व्यक्त केले.
सरहद या संस्थेच्या वतीने संजय नहार लिखित ‘बॉन्डिंग विथ काश्मीर’ या पुस्तकाचे प्रकाशन भट यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. जी. पाटणकर, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, सरहदचे संचालक प्रशांत तळणीकर, संस्थापक संजीव शहा उपस्थित होते.
भट म्हणाल्या, की अजूनही काश्मीरमधील नागरिक सतत होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांमुळे घाबरत जगत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मनासारख राहता व वागताही येत नाही. तिकडच्या लोकांना थोड्या प्रेमाची गरज आहे. आत्तापर्यंत कोणीच त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्टी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात थोडी कटुता निर्र्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्यांना प्रेम दिले पाहिजे, तेव्हाच काश्मीरचा, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होईल.
काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरांवर चर्चा केली जाते; परंत तेथील नागरिकांना नेमके काय हवे आहे, याबद्दल त्यांची विचारणाही केली जात नाही. काश्मीरमधल्या लोकांवर विश्वास नसल्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात येते. त्यामुळे तेथील लोक बाहेर गेले, तर त्यांच्याकडे आंतकवादी म्हणून पाहिले जाते. एकमेकांशी वाटणारी भीती आता कमी होऊन सध्या कश्मीर मधील परिस्थिती बदलत चालली आहे, असेही भट या वेळी म्हणाल्या.
दिलीप पाडगावकर म्हणाले, की कश्मीरमध्ये जम्मू-कश्मीर आणि लडाख या तीन प्रदेशांची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती वेगळ्या स्वरूपाच्या असून, तेथील लोकांना त्याप्रमाणे समजून घेतले पाहिजे. तसेच काश्मीरच्या खोऱ्यात कट्टरतावाद व फुटीरतावाद ही आता कमी होताना दिसत आहे. काश्मीरला इतर राज्यांप्रमाणेच विकास हवा आहे. त्यामुळे काश्मीर व काश्मिरीयन लोकांचा विकास होण्याची गरज आहे. तसेच कश्मीरचा प्रश्न सोडवताना आपल्याला काश्मीरसाठी प्रेम आहे की, कश्मिरीयनसाठी याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे.
(प्रतिनिधी)