गेल्या २०-२२ दिवसांपासून कुटुंबियांशी संवाद होत नसल्यामुळे चिंतेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:07 PM2019-08-26T14:07:15+5:302019-08-26T14:10:47+5:30
केंद्र शासनाने जम्मू काश्मिरसाठीचे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पुणे : केंद्र शासनाने ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय काश्मिरी नागरिकांवर लादला आहे. त्यामुळे काश्मिरी नागरिकांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. परिणामी काश्मिरचे जनजीवन विस्कळीत झाले असून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आम्हा काश्मिरी विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.त्याचप्रमाणे गेल्या २०-२२ दिवसांपासून कुटुंबियांशी संवाद होत नसल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी चिंतेत आहोत,अशा भावना काश्मिरी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
केंद्र शासनाने जम्मू काश्मिरसाठीचे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला.स्थानिक राजकीय नेत्यांना स्थानबध्द केले.काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना जम्मू-काश्मिरमध्ये जाण्यापासून रोखले, अशा वरवरच्या घटना दिसून येत आहेत.मात्र,काश्मिरमधील दूरध्वनी अजूनही सूरू झाले नाहीत.परिणामी काश्मिरमध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे,याबाबतची खरी माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.आमचे आई, वडील,बहिण,भाऊ,मित्र जिवंत आहेत की नाहीत? ही चिंता पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना सतावत आहे. काश्मिरमधील बँकिंग व्यवस्था व इंटरनेट बंद असल्याने आमचे पालक पैसे पाठवू शकत नाहीत.परिणामी आम्हा सर्व विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे,असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्येचे माहेरघर अशी ओळख असल्यामुळे काश्मिरमधून काही विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह सिंबायोसिस,अझम कॅम्पस मॉर्डन कॉलेज,वाडिया कॉलेज आदी महाविद्यालयात काश्मिरी विद्यार्थी एमबीए,बी.कॉम,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.वसतीगृहात प्रवेश न मिळाल्याने काही विद्यार्थी भाडेतत्त्वावर खोली घेवून राहत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जेवन,दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज भासते.परंतु,पैसे येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काश्मिरच्या एका बावीस वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले,मी ५ आॅगस्टपासून आजपर्यंत माझ्या कुटुंबियांशी संवाद साधू शकलो नाही. कुटुंबातील सदस्य,माझे मित्र जीवंत आहेत की नाही हे मला माहित नाही. काश्मिरमधील बँका व इंटरनेट बंद आहेत. त्यामुळे माझे पालक मला पैसे पाठवू शकले नाहीत. पैसे नसल्यामुळे घरभाडे,शैक्षणिक साहित्य खरेदी आदी गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
पदवी अभ्यासक्रमास शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाºया काश्मिरी विद्यार्थी म्हणाला,पुण्याप्रमाणे काश्मिरमध्ये शांतता का नाही? असा प्रश्न माझ्या मनात येतो. तसेच प्रत्येक वेळी काश्मिरी नागरिकांनाच दहशतवादी कारवाया, पोलिसांची दडपशाही,कफर््युचा सामना का करावा लागतो,असाही सवाल मला सतावतो.३७० कलम रद्द केल्यामुळे सध्या काश्मिरचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याची झळ आम्हाला बसत आहे.
......
ईदच्या शुभेच्छाही देता आल्या नाहीत
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून काश्मिरमध्ये अस्वस्थता आहे. मोबाईल इंटरनेट बंद असल्यामुळे कुटुंबियांशी संवाद होत नाही. त्यामुळे त्यांना नुकताच झालेल्या ईद सणाच्या शुभेच्छा ही देता आल्या नाहीत, अशा भावना एका विद्यार्थ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.नागरिकांनी रस्ते उकरले.
....................
स्थानिकांना विश्वास न घेता लोकशाही पध्दत डावलून केंद्र शासनाने काश्मिरचे ३७० कलम रद्द केले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलानी घरापासून सुमारे २० किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या पीसीओ (लॅण्डलाईन फोन) वरून माझ्याशी संवाद साधला. काश्मिरच्या नागरिकांना केंद्राचा निर्णय मान्य नाही.लष्कराच्या वाहनांनी आपल्या भागात प्रवेश करू नये म्हणून काश्मिरमधील नागरिकांनी रस्त्ये उकरून ठेवले आहेत, असे माझ्या वडिलांनी सांगितले. त्यामुळे काश्मिरमध्ये सर्व अलबेल आहे, ही माहिती पूर्णपणे खोटी आहे, असे काश्मिरच्या एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.