काश्मीरची टूर राहिली दूर..सव्वा लाखाला गंडा मात्र घातला..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:48 PM2018-10-10T16:48:11+5:302018-10-10T17:02:02+5:30
काश्मीरसाठी पॅकेज टूरचे बुकिंग घेऊन प्रत्यक्षात विमानाची तिकिटे बुक न करता तसेच सहलीला न नेता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
पुणे : काश्मीरसाठी पॅकेज टूरचे बुकिंग घेऊन प्रत्यक्षात विमानाची तिकिटे बुक न करता तसेच सहलीला न नेता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेटपोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. या कंपनीने आणखी काही जणांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत़.
या प्रकरणी रमेश कुलकर्णी (वय ५०, रा़ मुद्रे, ता़ कर्जत, जि़ रायगड) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार २१ मे ते २१ जुलै २०१८ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले, की विशाल टूर अँड ट्रॅव्हल या कंपनीचे कार्यालय स्वारगेटजवळील नटराज हॉटेल येथील मुक्ता अपार्टमेंटमध्ये आहे़. कुलकर्णी यांच्या पत्नी मेमध्ये या कार्यालयात गेल्या होत्या़. त्यांनी काश्मीर सहलीबाबत चौकशी करून विमानाने जाण्यायेण्याचे तिकीट व तेथील जेवण, राहणे आणि फिरण्याची सोय, असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पॅकेज घेतले व पाच जणांचे सव्वा लाख रुपये भरून बुकिंग केले़. परंतु, कंपनीने त्यांना कोणत्याही प्रकारची विमानाची तिकिटे बुक न करता व त्यांना टूरसाठी पाठविले नाही़ तसेच, त्यांचे पैसे परत न करता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली़. याप्रकरणी आणखी दोन तक्रारी आल्या असून सहायक पोलीस निरीक्षक एस़. एऩ. शेख अधिक तपास करीत आहेत़.