काश्मीरमध्ये अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 07:46 PM2019-10-09T19:46:35+5:302019-10-09T20:16:46+5:30
काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे येत्या काळात कळेल..
पुणे : काश्मीरसह भारताच्या कोणत्याही भागात होणारी हिंसा एका विशिष्ट पातळीपर्यंत थांबवणे, हे सैन्याचे काम आहे. मात्र, उद्रेक होऊन हिंसा वाढू नये, हे पाहणे राज्यकर्त्यांचे काम असते. प्रत्यक्षात काश्मीरप्रश्न हा राजकीय असून कलम ३७० मुळे असलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर सैन्य व राज्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल, असे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार व शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिकारी शशिकांत पित्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शशिकांत पित्रे यांच्या पत्नी मीरा पित्रे, ज्येष्ठ रक्तदाते दत्तात्रय मेहेंदळे, किरण पाटोळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, गिरीश पोटफोडे, होनराज मावळे, कल्याणी सराफ, योगिनी पाळंदे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी पित्रे यांना सपत्नीक औक्षण केले. सोनचाफ्याच्या फुलांची परडी, तिरंगी उपरणे, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली.
शशिकांत पित्रे म्हणाले, काश्मीरमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे समजू शकेल. सरकारने आतापर्यंत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. तसेच या प्रश्नी नक्की काय करायचे आहे, ही दिशा सरकारची स्पष्ट आहे.’