काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना दिलेला पुरस्कार रद्द; विद्यापीठ म्हणते, विसंवादातून दुर्दैवी परिस्थिती उद्भवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:53 AM2023-10-19T10:53:38+5:302023-10-19T10:53:49+5:30
पुरस्कार रद्द होण्यामागे विद्यापीठावर राजकीय दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नबी यांनी सांगितले
पुणे : काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना जाहीर केलेला ‘ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जर्नालिझम फाॅर पीस अवॉर्ड’ हा पुरस्कार अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय दबावापाेटी हा पुरस्कार रद्द केला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अंतर्गत विसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
पत्रकार सफिना नबी म्हणाल्या, मी काेणत्याही पुरस्कारासाठी अर्ज केलेला नव्हता. मात्र, विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागातर्फे दि. ११ ऑक्टाेबर राेजी ई-मेल पाठवून तसेच काॅल करून मला हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविण्यात आले हाेते. त्यामध्ये प्रतिष्ठित सात सदस्यीय ज्युरी ज्येष्ठ पत्रकार एम.के. वेणू, व्यंग्यचित्रकार संदीप अध्वर्यू, लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मेहता अशा एकूण सात सदस्यांनी माझी पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे नमूद हाेते. पुरस्कार साेहळ्याच्या दाेन दिवसांपूर्वी साेमवारी दि. १६ राेजी मला विद्यापीठातून एका व्यक्तीचा काॅल आला आणि त्यांनी मला जाहीर केलेला पुरस्कार रद्द केला असल्याची माहिती दिली. या प्रकारामागे विद्यापीठावर राजकीय दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नबी यांनी सांगितले.
दरम्यान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही पारदर्शक, अराजकीय, नि:पक्ष संस्था आहे. अंतर्गत विसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली आहे. माध्यम क्षेत्रातील माेठ्या कार्याचा आदर करून आगामी पुरस्कार साेहळ्यात त्यांचा गाैरव करू, अशी चर्चा केली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.