काश्मीरी विद्यार्थ्यांना गैरसमजाचे बळी होऊ देणार नाही : हिंदुत्वादी संघटनांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:18 PM2019-03-11T16:18:38+5:302019-03-11T16:24:55+5:30
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत देशात अनेक ठिकाणी काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले.
पुणे : आमची लढाई पाकिस्तानशी आहे, काश्मीरी जनतेशी नाही. त्यामुळेच देशद्रोह्यांना विरोध करतानाच काश्मिरी विद्यार्थ्यांना त्रास दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाही. त्यांना गैरसमजाचे बळी होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी दिली. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत देशात अनेक ठिकाणी काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. या हल्लयांमध्ये मुख्यत: हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर वंदे मातरम संघटनेच्या पुढाकाराने पुण्यात सरहद संस्थेमध्ये काश्मीरी विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटनेने पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे गोपाळ चिंतल, शिवसेनेचे आनंद दवे, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे श्रीपाद रामदासी, समस्त हिंदू आघाडीचे सौरभ करडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मयुर गिते, पतितपावन संघटनेचे स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते.
वंदे मातरम संघटनेचे सचिन जामगे, संतोष देवकर, महेश बटाले, प्रशांत नरवडे, किरण राऊत तसेच जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचे आकीब भट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरमध्ये मराठी पर्यटकांसाठी केलेल्या मदतकायार्ची आणि अनेकांचे कुटुंब हिंसाचाराची शिकार झाल्याची माहिती दिली.
काश्मीरी विदयार्थ्यांवर होणा-या हल्ल्यांना आपला कोणताही पाठिंबा नसून, याउलट असे कृत्य करणा-यांवर कारवाई करु, असे आश्वासन उपस्थित पदाधिका-यांनी दिले. आमच्या नावावर कोणी असे प्रकार केल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल, असे श्रीपाद रामदासी यांनी सांगितले. अभाविपचे मयूर गिते यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांचा स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. आनंद दवे, धनंजय जाधव यांनी तात्पुरत्या प्रसिध्दीसाठी अशा घटना घडवून आणणा-यांवर कारवाईची मागणी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जम्मूरियत, काश्मिरीयत आणि इंसानियत या त्रिसुत्रीचा भाजपच्या वतीने प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे, असे गोपाळ चिंतल म्हणाले.
ह्यहा देश आमचाही आहे, ही भावना काश्मीरी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. काही मोजक्या घटनांमुळे किंवा लोकांमुळे एखादे राज्य किंवा देश काश्मीरींच्या विरोधात आहे, ही भावना मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. त्याचवेळी कोणत्याही दहशतवादी घटनांना पाठिंबा देणार नाही, अशा भावना काश्मीरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीस शहरातील विविध संस्थांमधील काश्मिरी विद्यार्थी उपस्थित होते.