पर्वतीवर साकारतोय ‘कटक ते अटक’ मराठेशाहीचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:02 PM2020-03-01T16:02:10+5:302020-03-01T16:11:21+5:30
छत्रपती शिवराय ते शाहू महाराजांपर्यंतची कारकीर्द
लक्ष्मण मोरे -
पुणे : छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू आदींच्या काळातील मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहासपर्वतीवर साकारला जात आहे. महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पर्वतीच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्या हाताला पालिकेचे कै. नवलोजी तावरे उद्यान आहे. या उद्यानातली एक ते सव्वा एकर जागा पडून होती. पुण्यातील महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या पर्वतीला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. यासोबतच जिल्ह्यातील आणि राज्यभरातील शाळांच्या सहलीसुद्धा येत असतात. पेशव्यांनी पर्वतीचे मंदिर बांधले. सध्या पर्वतीवर शंकर, विष्णू, कार्तिकेय, गणपती यांची मंदिरे आहेत. यासोबतच एक वस्तू संग्रहालयसुद्धा आहे.
पर्वतीवर येणाऱ्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांना मराठेशाहीचा इतिहास समजावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी याकरीता या उद्यानात नगरसेवक रघुनाथ गौडा यांच्या निधीमधून कायमस्वरुपी ऐतिहासिक शिल्प साकारण्यात येणार आहे. या शिल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यात मराठेशाहीचा इतिहास सर्वांसाठी खुला होणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.
................
तेरा किल्ल्यांच्या प्रतिकृती
या स्वराज्यसृष्टीत प्रवेश केल्यानंतर समोरच स्वराज्यातील तेरा महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. या किल्ल्यांसाठी मोठाले चौथरे उभे करण्यात आले असून तेथे किल्ल्यांचा इतिहास नुसताच वाचता येणार नाही तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून ऐकताही येणार आहे. नागरिक प्रशस्त जागेतून फिरत फिरत या किल्ल्यांचा इतिहास समजावून घेऊन शकणार आहेत. हे किल्ले शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांनी तयार केले आहेत.