"चौकशी सुरू असल्याने कटारे व्यथित झाले असावेत..." पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:54 PM2024-06-01T12:54:46+5:302024-06-01T12:58:10+5:30
कटारे व्यथित झाले असतील म्हणून त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत’, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.....
पुणे : ‘भूसंपादन केल्यानंतर जाहीर केलेल्या निवाड्यानुसार मोबदला देताना खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. चौकशी केल्यानंतरही संबंधित रक्कम न्यायालयात जमा न करणे, त्यांच्याच निर्णयाविरोधात पुन्हा वेगळा निर्णय देणे, अशा स्वरूपाच्या तक्रारींनंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांची चौकशी करण्यात येत होती. यामुळे कटारे व्यथित झाले असतील म्हणून त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत’, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
ते पत्रकारांशी बोलत होते. दिवसे म्हणाले, “कटारे यांचे काम काढून घेण्यात आले होते. मात्र, ही कारवाई पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा काम बहाल करण्यात आले होते. मात्र, रिंगरोड, तसेच पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनात तक्रारींचा ओघ वाढत असल्याने त्याची चौकशी करणे जिल्हाधिकारी या नात्याने माझे कर्तव्यच होते. जिल्हाधिकाऱ्यांना तसे अधिकारही आहेत. निवडणुकीच्या काळात मी जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे मला अनेक लोक भेटण्यास येतात; परंतु एखाद्याच्या सांगण्यावरून मी कोणतीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे कटारे त्यांच्या आरोपाला उत्तर देणे योग्य वाटत नाही.”
कटारे यांच्या आरोपानुसार त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, दिवसे यांनी या आरोपाचे खंडन करीत त्यांच्या बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच आहेत. माझ्याकडून असा कोणताही प्रस्ताव गेला नसल्याचे स्पष्ट केले. मुळात भूसंपादनाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. कामाचे समान वाटप व्हावे, यादृष्टीने कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्या अधिकारांचे वाटप केले जाते. त्यानुसार प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, तसेच मोबदला वाटण्याचे काम करीत असतात. एखाद्या अधिकाऱ्याकडे असमान काम असल्यास त्यांच्याकडील काम इतरांना देण्यात येते, असेही ते यावेळी म्हणाले. कटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डावलून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र लिहिल्याने हा शिस्तभंगाचा प्रकार असून पत्राची दखल घेऊन योग्य कार्यवाहीनंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.