पुण्यात शिवाजीनगरपेक्षा कात्रज, खडकवासला येथे सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 06:26 AM2020-10-20T06:26:16+5:302020-10-20T06:30:02+5:30
गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या पावसानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळल्यानंतरही वर्षभरात ही केंद्रे सुरु होऊ शकली नाही...
पुणे : हवामान विभागाकडून शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण येथेच पर्जन्य व तापमानाची नोंद केली जाते. शिवाजीनगर येथे पडलेला पाऊस हा पुणे शहराचा पाऊस म्हणून मोजला जातो. प्रत्यक्षात त्यापेक्षा कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, त्याचवेळी शहराचा दक्षिण भाग असलेल्या कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असूनही त्या भागातील पावसाची नोंद शासकीय पातळीवर होत नसल्याने पुणे शहरातील पावसाचे नेमके चित्र स्पष्टपणे समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या पावसानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळल्यानंतरही वर्षभरात ही केंद्रे सुरु होऊ शकली नाही.
१ जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्याचा पाऊस मॉन्सूनचा पाऊस म्हणून मोजला जातो. त्यानंतरचा पाऊस हा पर्जन्योत्तर पाऊस गृहित धरला जातो. १ जून ते १९ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर येथे १ हजार ४ मिमी पावसाची नोंद झाली असून लोहगाव येथे १०४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पाषाण येथे ९९०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आशय मेजरमेंटनुसार याच काळात कात्रज येथे ११२६.२ मिमी, खडकवासला येथे १२४०.६ मिमी, वारजे येथे ९५८.३ मिमी आणि कोथरुड येथे ९५०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.१ ऑक्टोबरपासून १९ ऑक्टोबरपर्यंतही शिवाजीनगर पेक्षा खडकवासला व कात्रज भागात अधिक पावसाची नोंद झाली आहे.
शिवाजीनगरपेक्षा सलग दुसऱ्या वर्षी कात्रज भागात जास्त पाऊस झाला असला तरी अजूनही त्या भागात पर्जन्य मापन केंद्र सुरु होऊ शकले नाही. २५ सप्टेंबरच्या प्रलयकारी पावसानंतरही जिल्हा प्रशासनाने हवामान विभागाकडे पाठपुरावा न केल्याने हे केंद्र सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे या भागातील अधिकृत पावसाची शासकीय पातळीवर नोंद होऊ शकत नाही. सध्या या भागात असलेल्या खासगी स्वयंचलित केंद्रामुळे या भागात किती पाऊस पडतो याची किमान काही माहिती उपलब्ध होत आहे. किमान येत्या काळात तरी या भागात स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र सुरु होण्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
़़़़़़़़़
१ जून ते १९ ऑक्टोबरपर्यंत पडलेला एकूण पाऊस (मिमी)
शिवाजीनगर १००४.६
लोहगाव १०४४
पाषाण ९९०.३
कात्रज ११२६.२
खडकवासला १२४०.६
वारजे ९५८.३
कोथरुड ९५०.४
...
शहरात आणखी चार दिवस वृष्टी
मध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शहरातील सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सकाळपर्यंत लोहगाव येथे ५६ मिमी, शिवाजीनगर येथे ३२.६, पाषाण येथे ३७.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी कात्रज ५४, खडकवासला ६२, वारजे ३८, कोथरुड ३२.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दुपारी ३ वाजल्यानंतर शहरात पुन्हा एकदा मुसळधार वृष्टी झाली. काही वेळ झालेल्या या पावसाची शिवाजीनगर येथे १५ मिमी इतकी नोंद झाली.त्याचवेळी लोहगाव येथे अगदी तुरळक पाऊस झाला.कात्रज येथे १४ मिमी, खडकवासला १८, वारजे ४़६, कोथरुड येथे ९. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.