Katraj Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा झालाय; रुंदीकरण होणार कधी? भूमिपूजनाला सहा वर्षे लोटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:44 PM2024-06-13T12:44:31+5:302024-06-13T12:45:20+5:30
कात्रज चौक ते खडी मशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५३ अपघात झाल्याची नोंद असून २५ जणांचा बळी गेलाय
पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhwa Road) रुंदीकरण करताना इस्कॉन मंदिराच्या चौकात ग्रेड सेपरेटरसाठी खड्डा खोदला. खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील सुरेक्षाचा मुद्दा ऐरणीवर आहे. या घटनेनंतर दोन दिवसांतच याच रस्त्यावर बंद पडलेली पीएमपीची गाडी टोईंग करताना झालेल्या अपघातात एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे.
या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. तरीही निर्ढावलेल्या प्रशासन यंत्रणेला जाग येत नाही. या रस्त्यावरील भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने या रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. महापालिकेने २०१८ मध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. आता सहा वर्षे झाली, तरीही भूसंपादनाअभावी काम ठप्प आहे.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर कात्रज आणि लगतच्या गावात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती झाली. त्यामुळे बाह्यवळण रस्ताही आता कमी पडू लागला आहे. कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपी रोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशीन चौक ते पिसोळी पालिका हद्दीपर्यंत आहे. या रस्त्यांचे काम २४१ कोटींचे असून, आतापर्यंत ४८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटींची आवश्यकता होती; पण भूसंपादन न झाल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. राजस सोसायटी ते कपिलामृत डेअरीपर्यंत रस्ता झाला आहे. त्यापुढे या रस्त्याचे काम झालेले नाही. खडी मशीन चौकाच्या अलीकडे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे, पण त्यापुढेही काम झालेले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम कुठेच सलग झाले नाही. त्यामुळे नागरिकांना याचा फारसा फायदा होत नाही. त्यातच आता भूसंपादनामुळे पांढरा हत्ती ठरलेल्या आणि दीर्घकाळ रेंगाळलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पूर्वीच्या ८४ ऐवजी त्याची रुंदी ५० मीटर केली जाणार आहे. यामध्ये सेवा रस्त्याचा समावेश असला, तरी सायकल ट्रॅक, पदपथ, तसेच वृक्षारोपणासाठीचा 'ग्रीन ट्रॅक' वगळण्यात आले आहेत. पण, अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. महापालिकेने २०१८ मध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. आता सहा वर्षे झाली, तरीही भूसंपादनाअभावी काम ठप्प आहे.
या रस्त्यावर इस्कॉन चौकातील ग्रेड सेपरेटरचे काम केल्यास वाहतूक कोंडी सुटणार असल्याचे सांगून तीन महिन्यांपूर्वी येथील काम हाती घेतले होते. त्यासाठी कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी हलविण्यात आली. त्यानंतर कामाला वेग येईल. मात्र त्यावरही तोडगा काढलेला नाही. या ठिकाणचे काम ठप्प झाल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात जमा झाले आहे. तेथे नागरिकांनी जाऊ नये, यासाठी महापालिकेने सुरक्षारक्षक नेमलेला नाही. त्यामुळे या दुर्घटनेत एका मुलीचा बळी गेला.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम गतीने व्हावे, यासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रशासनाला कामाला लावले होते. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन सूचना देत असल्याने वर्षभरात भूसंपादनासह कामाला गती आली होती. त्यामुळेच ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होऊ शकले. पण त्यांची तीन महिन्यांपूर्वी बदली झाली अन् महापालिकेची यंत्रणा ढिली पडली. पुढील काम करण्यासाठी जागा ताब्यात नसल्याने तीन महिन्यांपासून काम बंद आहे. जागामालक रोख मोबदला मागत आहेत, त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
१४० कोटींचा निधी मिळालाच नाही
शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हा निधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे निधी महापालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मृत्यूचा सापळा ....
कात्रज चौक ते खडी मशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५३ अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यात २५ जणांचा बळी गेला आहे. अरुंद रस्ता, अवजड वाहतूक, रस्त्यावरील खड्डे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.