कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:19 PM2019-05-15T13:19:10+5:302019-05-15T13:23:18+5:30
सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली.
अभिजित डुंगरवाल
कात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून कुपरिचित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे संपूर्ण भूसंपादन न करता सुरू केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले, तरी चाललेल्या संथगतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का, यामध्ये शंका निर्माण होत आहे.
सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली. सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली. राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या सुमारे ३ किमीच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले. तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणून या रस्त्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्यावर ग्रेड सेप्रेटर, सायकल ट्रॅक, झाडे, फुटपाथ, सर्व्हिस रोड, अंडर बायपास असा अतिशय देखणा प्लॅन पालिकेने मंजूर केला आहे. यासाठी पटेल इंजिनियर्स यांना १४९.५२ कोटी रुपयाला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजनदेखील झाले. पहिल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) फक्त३ कोटी रुपये या रस्त्यासाठी देण्यात आले. आता या आर्थिक वर्षात (२०१९-२०) ३० कोटी रुपये या कामासाठी देण्यात आले आहेत. म्हणजे, दीड वर्षाच्या कामासाठी फक्त ३३ कोटी पालिकेने दिले आहेत. तीन वर्षांच्या या प्रकल्पाच्या फक्त सुमारे २२ टक्केच रक्कम देण्यात आली आहे.
या रस्त्याची पाहणी केली असता अजून पालिकेने ४० टक्के देखील जागा ताब्यात घेतलेली दिसत नाही; मात्र पालिका अधिकारी येथील ६२ टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा करीत आहेत. हा रस्ता होणे ही काळाची गरज आहे. या रस्त्यामुळे येथील वाहतूककोंडी सुटणार आहे, या भागाचा कायापालट करणारा हा प्रकल्प ठरणार आहे, या रस्त्यावरील अपघातही कमी होतील; मात्र संथ गतीने चाललेल्या या कामामुळे पुन्हा नागरिकांच्या कररुपी भरलेल्या पैशाला कात्री लागून नये ही अपेक्षा आहे. कारण, प्रकल्प रेंगाळला की त्याची किमत वाढते व याचा फायदा फक्त ठेकेदाराला होत असतो. या रस्त्याचे काम रेंगाळण्यासाठी दोनच गोष्टी कारणीभूत ठरू शकतात, त्या म्हणजे रस्त्यामध्ये बाधित होणाºया जागेचे हस्तांतरण व निधीची कमतरता.
या दोन्ही गोष्टींकडे पालिका आयुक्तांनी आताच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नंतर जर या कारणांनी प्रकल्प रखडला व त्याची किंमत वाढली, तर कात्रजकरांना नेत्यांनी व पालिकेने फसविल्याची भावना तयार होईल.
.......
कात्रज- कोंढवा रस्त्याचे सुमारे ६२.५ टक्के जमिनीचे टीडीआरपोटी हस्तांतरण झालेले आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी आमच्या जागामालकांशी सतत बैठका सुरूआहेत. हे काम वेळेत पूर्ण होईल हा आमचा प्रयत्न असेल.- सुनील कदम, उपअभियंता, रस्ते विभाग
......
पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेने ७२ ब नुसार या कामांचे दायित्व घेतले आहे. ठेकेदार जेवढे काम करेल तेवढे पैसे देण्यास महानगरपालिका जबाबदार आहे. या रस्त्यासाठी पालिका पैशाची कमी पडून देणार नाही. येथील नागरिकांनी देखील रस्ता लवकर सुरू व्हावा, यासाठी सहकार्य करावे. - योगेश टिळेकर, आमदार