कात्रज तलावाची पाहणी
By admin | Published: December 27, 2015 02:06 AM2015-12-27T02:06:54+5:302015-12-27T02:06:54+5:30
गेली काही वर्षे बंद असलेले कात्रज तलावातील बोटिंग लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी कात्रज तलावाची
पुणे : गेली काही वर्षे बंद असलेले कात्रज तलावातील बोटिंग लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी कात्रज तलावाची पाहणी केली असून, बोटिंग सुरू करण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्रही पाठवले आहे.
स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी यासाठी वारंवार मागणी केली, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे लक्षात आल्यावर थेट महापालिका सभागृहात तसेच महापौरांच्या दालनात कृत्रिम बोट नेऊन आंदोलनही केले. एमटीडीसीने याबाबत हालचाल सुरू केली असून, आता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुढाकार घेऊन याबाबत त्वरित निर्णय घेतला, तर मुलांसाठी लवकरच नौकानयन सुरू होईल.
एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली चव्हाण यांनी जुन्या
कात्रज तलावाच्या वर असलेल्या
नव्या तलावाची यासाठी नुकतीच पाहणी केली.
चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना एक पत्रही एमटीडीसीच्या वतीने लगेचच पाठवले. त्यात त्यांनी २ व ४ आसनांच्या प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २० बोट, तसेच ५ वॉटर सायकल, ५ रो बोट , त्याचबरोबर २०० जीवरक्षक जॅकेट व बोट सोडण्यासाठी एक जेट्टी असा एकूण ५० लाख रूपयांचा खर्च यासाठी येईल, असे कळवले आहे.
आयुक्तांनी आता यावर त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसे आश्वासनही आयुक्त कुणाल कुमार व महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभागृहात दिले आहे. (प्रतिनिधी)
कात्रजच्या जुन्या तलावात यापूर्वी एमटीडीसीच्या वतीने बोटिंग करण्यात येत होतेच. महापालिकेने यासाठी त्यांच्याबरोबर रितसर करार केला होता. त्यानुसार एमटीडीसी महापालिकेला वार्षिक विशिष्ट रक्कम अदा करत होती. अनेक बालगोपाल या बोटिंगचा आनंद लुटत होते. मात्र, नंतर ते बंद झाले. या तलावाच्या वर झालेल्या नव्या तलावात ते सुरू व्हावे, यासाठी मोरे प्रयत्न करीत होते, त्याला आता यश मिळते आहे.