कात्रज ते नवले पूल रस्ता : सव्वाशे कोटींचा निधी अखेर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 02:11 AM2018-11-08T02:11:08+5:302018-11-08T02:11:15+5:30

नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी नुकताच केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.

 Katraj to Navale Pool Road: Savvy crore funds are finally approved | कात्रज ते नवले पूल रस्ता : सव्वाशे कोटींचा निधी अखेर मंजूर

कात्रज ते नवले पूल रस्ता : सव्वाशे कोटींचा निधी अखेर मंजूर

googlenewsNext

नऱ्हे : नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी नुकताच केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. लवकरच या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे, त्यामुळे वाहतूककोंडीत सापडलेला रस्ता आता नागरिकांना वाहतुकीसाठी सुखकर ठरणार आहे.
नवले पूल ते कात्रज या महामार्गालगत अनेक मंगल कार्यालये असून लग्नसराईच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याजवळच शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थी, पालक, स्कूलबस आदी या महामार्गाचाच वापर करत असल्याने वारंवार वाहतूककोंडी होते. परंतु वाहतूक पोलिसांकडे यावर ठोस उपाययोजना नाही.
सध्याचा रस्ता हा चारपदरी असून तो सहापदरी होणार आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुपदरी सेवा रस्ता होणार आहे. मुख्य रस्ता व सेवा रस्ता यामध्ये दोन मीटरची भिंतही बांधली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणताही अडथळा न येता होणारी वाहतूककोंडी कमी होईल. तसेच सेवा रस्ता झाल्यानंतर स्कूलसाठी येणारे विद्यार्थी स्कूलबस व पालक हे सेवा रस्त्याचा उपयोग करतील. तसेच येथे पेट्रोल पंपही असल्याने येथे पेट्रोल भरावयास आलेल्या गाड्या या उलट्या दिशेने परत जातात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. मात्र सेवा रस्ता झाल्यास नागरिकांना पेट्रोल भरल्यानंतर उलट्या दिशेने जाण्याची गरज भासणार नाही, परिणामी होणारे अपघात टळतील.
सिंहगड रस्ता व सातारा रस्ता या प्रमुख मार्गाला जोडणारा, तसेच नवीन मुंबई-बेंगलोर महामार्गास मिळणारा उपनगरातील महत्त्वाचे बाह्यवळण मार्ग म्हणजे नवले पूल ते कात्रज रस्ता सध्या हा रस्ता वाहतूककोंडी, अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक प्रवासी वाहतूक, खराब रस्ते आदी कारणामुळे धोकादायक बनलेला आहे. येथे रोज दोन-तीन अपघात घडतच असतात. मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र आता सेवा रस्ता झाल्यास वाहतूक सेवा सुरळीत होईल, असे जाणकारांचे मत आहे. सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माहितीनुसार, नवले पूल ते कात्रज चौक या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने सुमारे सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची सुरुवात होणार आहे.

नवले पूल ते कात्रज मार्गासाठी सव्वाशे कोटीचा निधी मंजुरीसाठी मी स्वत: आमदार भीमराव तापकीर, खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.
- अरुण राजवाडे, अध्यक्ष, भाजपा खडकवासला मतदारसंघ

सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रियेचे काम लवकर व्हावे, तसेच प्रत्यक्षात काम लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
- भीमराव तापकीर, आमदार खडकवासला मतदारसंघ

नवले पूल ते कात्रज रस्ता ह्या महामार्गासाठी निधी मंजूर झाला असून मात्र अजून निविदा प्रक्रिया करणे बाकी आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
- गणेश चौरे, कार्यकारी अभियंता 

महामार्गालगत असणारी अतिक्रमणे व वाहतूककोंडीमुळे आम्हा नागरिकांना प्रचंड मन:स्ताप होत असून शासनाने यावर लवकर कार्यवाही करावी. - चंद्रकांत कुंभार, नागरिक

Web Title:  Katraj to Navale Pool Road: Savvy crore funds are finally approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे