पुणे तिथे काय उणे : कात्रज ते येरवडा रिक्षा प्रवासाचे भाडे ४३०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:36 PM2019-09-19T16:36:12+5:302019-09-19T16:38:23+5:30
कात्रज ते येरवडा या भागात जाण्यासाठी एका रिक्षाचालकाने थोडे -थोडके नव्हे तर ४हजार ३०० रुपये इतके पैसे प्रवाशांकडून उकळले आहे. पैसे दिल्यानंतर मात्र या प्रवाशाने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुणे : कात्रज ते येरवडा या भागात जाण्यासाठी एका रिक्षाचालकाने थोडे -थोडके नव्हे तर ४हजार ३०० रुपये इतके पैसे प्रवाशांकडून उकळले आहे. पैसे दिल्यानंतर मात्र या प्रवाशाने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बंगरुळुवरून पुण्यात पहाटेच्यावेळी पोचलेला प्रवासी कात्रज येथे उतरला. त्यावेळी प्रयत्न करूनही त्याला कॅब उलब्ध झाली नाही. त्यामुळे त्याने जवळून जाणारी रिक्षा थांबवली. त्यावेळी त्यांचे मीटरनुसार भाडे घेण्याचे ठरले. या रिक्षाचा मूळ रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत मागे बसला होता तर त्याचा मित्र रिक्षा चालवत होता.
अखेर येरवडा पोलीस स्टेशनजवळ रिक्षा पोचल्यावर त्याला ४ हजार ३०० रुपये भाडे झाल्याचे सांगण्यात आले. यात अधिक स्पष्टीकरण देताना चालकाने शहरात यायचे ६०० व जायचे ६०० आणि मीटरचे भाडे असे एकत्र करून पैसे द्यावे लागतील असे सांगितले. अखेर मद्यधुंद चालक आणि आजूबाजूला असणारा एकांत बघून प्रवाशाने फारसा विरोध न करता पैसे दिले. मात्र रिक्षा रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करून त्याने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.