कात्रज- कोंढवा रस्त्यावर जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:59 AM2019-07-20T11:59:55+5:302019-07-20T14:08:39+5:30
कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
पुणे : उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारण्यात आली होती. त्यानंतर आता कुठे जरा पाऊस होतो न होतो तोच पुन्हा पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसू लागला आहे. कात्रज- कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना मोठी जलवाहिनी साडेदहाच्या सुमारास फुटली. या वाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया गेले.
कात्रज - कोंढवा बाह्यवळण मार्गाच्या रुंदीकरणासाठी जेसीबीने बेजबाबदारपणे खोदाई केल्यामुळे मोठी जलवाहिनी फुटून मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेल्याची घटना राजस सोसायटी चौकात शनिवारी सकाळी घडली. प्रचंड दाबाने फेकल्या गेलेल्या पाण्यच्या फवाऱ्याने महामार्गावरी वाहतूक प्रभावित झाली.
कात्रज कोंढवा मार्गालगत कात्रजकडून कोंढव्याकडे चार फूट व्यासाची जलवाहिनी जाते. या मार्गाच्या पुर्नविकासाअंतर्गत रूंदीकरणाचे काम सुरू आहे. शनीवारी सकाळी जेसीबीने खोदाई सुरू असताना जलवाहिनी फुटली आणि मोठ्यादाबाने पाणी बाहेर फेकले गेले. तब्बल चारशे फूटांचा परिसरात पाणी फेकले जात होते. महामार्गावर एकच गोंधळ झाला आणि वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी पाणी पुरवठा विभागाल माहिती दिल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. जलवाहिनीतील पाणी तासभर मागे उताराने बाहेर पडत राहिले. दरम्यान लाखो लिटर पाणी वाहून गेले होते. कात्रज चौकातील राजीव गांधी पंपींग स्टेशन ते कोंढव्याच्या पाण्याच्या टाकीकडे चार फूट व्यासाची मुख्य लाईन जाते. या वाहिनीचा आराखडा ठेकेदाराला देण्यात आला होता मात्र हलगर्जीपणे खोदाई करून जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणि पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनिल अहिरे यांनी दिली.
...............
* सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम म्हणाले, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ठेकेदाराला दंड आकारुन झालेल्या नुकसानची भरपाई देण्यात यावी.