वाळूमाफियांकडून कोतवालाचे अपहरण
By admin | Published: February 4, 2016 01:36 AM2016-02-04T01:36:15+5:302016-02-04T01:36:15+5:30
अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग कारवाई करीत असताना पकडलेला ट्रक पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने वाळूमाफियांनी कोतवालाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला
लोणी काळभोर : अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग कारवाई करीत असताना पकडलेला ट्रक पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने वाळूमाफियांनी कोतवालाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवून सुमारे १८ किलोमीटर पाठलाग करून त्याची सुटका केली. ट्रक चालक व मालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.
मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, सदर प्रकार १ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५च्या सुमारास उरुळी कांचन एलाईट हॉटेलसमोर घडला. यामध्ये कोतवाल श्रीरामलिंग भोसले यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ट्रकचालक रोहिदास व मालक अनिल अंकुश शितोळे (संपूर्ण नाव पत्ता नाही) या दोघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार महेश पाटील, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांच्यासमवेत कामगार तलाठी स्वप्निल पटांगे, योगिराज कनिचे, दाबके, अव्वल कारकून श्रीनिवास कंडेपली आदींचे महसूल पथक १ फेब्रुवारी रोजी रात्री उरुळी कांचन येथील एलाईट चौकात पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाळूवहातुकीला आळा घालण्यासाठी कारवाई करीत होते. रात्री १०.१५च्या सुमारास सोलापूर बाजूकडून वाळूने भरलेला ट्रक (एमएच ४२-टी २३१८) आला. ट्रकचालक व मालकांकडे गाडीची कागदपत्रे व वाळूबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यांना ट्रक उरुळी कांचन दूरक्षेत्रात घेण्यास सांगितले. या वेळी कोतवाल श्रीरामलिंग भोसले हे ट्रकमध्ये बसले. ट्रकचालकाने ट्रक चालू केला व तो पोलीस दूरक्षेत्रात न नेता दौंडकडे भरधाव नेला.
कोतवाल श्रीरामलिंग भोसले यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच महसूल पथकाने पोलिसांची ताबडतोब मदत मागितली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन संबंधित गाडीचा पाठलाग सुरू केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतर्कतेने बारामती विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटना सांगून पलायन केलेले वाहन दौंड तालुक्यात असल्याचे सांगितल्याने यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गायकवाड संबंधित वाहनाचा शोध घेऊ लागले. पलायन केलेल्या वाहनाचा सहजपूर फाटा, नंतर नांदूर गावमार्गे खामगाव, नागवडे हद्दीपर्यंत महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग सुरूच ठेवल्याने चालक व अन्य एक जण वाहन सोडून शेतातून पळून गेले.
ट्रकचा पाठलाग सुरू केला तेव्हा सुमारे १८ किलोमीटर आपला पाठलाग होत आहे, हे लक्षात येताच ट्रकचालक व मालकाने ट्रक दौंड तालुक्यातील खामगाव (नागवडे) येथे उभा केला व ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
अर्धा तासाच्या पाठलागानंतर अपहरण करण्यात आलेले कोतवाल श्रीरामलिंग भोसले हे सुखरूप आहेत, हे पाहून महसूल पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आज दुसऱ्या चालकाच्या मदतीने तो ट्रक उरुळी कांचन दूरक्षेत्राच्या आवारात आणून ठेवण्यात आला. (वार्ताहर)