कौतुकने पटकाविला मुळशी सेना चषक : मुन्ना झुंजुरकेवर ५-० ने मात करत पटकावली चांदीची गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:55 PM2018-01-30T12:55:00+5:302018-01-30T12:59:38+5:30
पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला.
पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिरंगुट येथे मुळशी तालुका शिवसेनेतर्फे या राज्यस्तरीय ‘सेना चषक किताब कुस्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हा उपप्रमुख बबनराव दगडे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे, अविनाश बलकवडे, बाबासाहेब चिकणे, बाळासाहेब भांडे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सुनील चांदेरे, वैभव पवळे, दीपक करंजावणे, कुलदीप कोंडे, विजय केदारी, सुरेश मारणे, नानासाहेब मारणे, आबासाहेब शेळके, राजाभाऊ मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
हलगीवादक राजू आवाळे यांच्या हलगीवादनाने मैदानात रंगत आणली. प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकरअण्णा पुजारी व बाबाजी लिम्हण यांनी समालोचन केले. अंतिम फेरीत मुन्ना झुंजुरके व कौतुक डाफळे यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत कौतुक ३-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या निर्णायक फेरीत कौतुकने दोन गुणांची कमाई करीत ५-० अशी आघाडी घेत विजय मिळवला. उपविजेत्या मुन्ना झुंजुरकेला रोख पन्नास हजार रुपये व चषक देण्यात आला.
स्पर्धेच्यानिमित्ताने महाराष्ट्र चॅम्पियन मुन्ना झुंजुरके व उपमहाराष्ट्र केसरी जालन्याचा विलास डोईफोडे यांची बेमुदत निकाली कुस्ती झाली. १० व्या मिनिटाला मुन्ना झुंजुरकेने विलास डोईफोडेला लपेट डावावर चितपट केले. त्याला रोख एक लाख रुपये व चषक देण्यात आला.