पक्षी सप्ताह विशेष : पुण्याजवळील 'कवडीपाट' पक्षी निरीक्षण केंद्राची कचऱ्यामुळे लागलीय ‘वाट’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 05:49 PM2020-11-07T17:49:25+5:302020-11-07T17:58:02+5:30
सुमारे २०० हून अधिक विविध प्रजातींचे दर्शन
पुणे : पक्षी निरीक्षण करण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण म्हणून 'कवडीपाट'ची ओळख आहे. पण गेल्या काही वर्षांपासून पावसानंतर येथे पुण्यातील कचरा वाहून येतो आणि येथील पुलाला अडकून ढीगच्या ढीग साठला जात आहे. त्याचा परिणाम हे ठिकाण घाण होत असून, पक्ष्यांनाही खाद्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
पुणे शहराच्या अतिशय जवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे दररोज खूप फोटोग्राफर येथे पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी येतात. या ठिकाणी स्थानिक आणि स्थलांतर अशी सुमारे २०० पेक्षा अधिक पक्षी येतात. कवडीपाटची सध्याची अवस्था खूप बिकट आहे. १५ वर्षांपूवर्प खूप चांगली स्थिती होती. पण आता नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. ग्रामस्थांच्या मते प्रदूषित पाण्यामुळे शेतीच्या पीकपध्दतीवरही परिणाम होत आहे. एक समृध्द पक्षीअधिवास असलेल्या इथल्या जलपरिसंस्थांचे संवर्धन करणं महत्त्वाचे आहे. शासन, लोकसहभाग, पयार्वरणस्नेही यांच्या सोबतीने हे साध्य करावे लागणार आहे, अशी अपेक्षा पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी व्यक्त केली.
कवडीपाटला आढळणारे पक्षी :
नदीसुरय, ब्राह्मणी बदक उर्फ चक्रवाक, थापट्या, टिबुकली, सर्जा, पांढरा शराटी, चक्रांग, डोंबारी, स्पूनबिल (चमच्या), पाणकावळे, गाणारा थोरला धोबी, वारकरी (काॉमन कुट), धनवर (स्पॅाट बिल डक), कवड्या खंड्या (पाईंड किंगफिशर), तुतारी (सँडपायपर), शेकाटे असे विविध पक्षी या ठिकाणी पहायला मिळतात.
स्वच्छतेसाठी प्रयत्न हवेत...
सध्या काही संस्थांचे ग्रुप त्या ठिकाणी येऊन स्वच्छता करतात. पण जर पुण्यातून नदीमार्गे येणारा कचरा थांबविला तरच या ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप येणार नाही. त्यासाठी नदीत कचरा टाकणे बंद करायला हवे. कवडी पाटी महापालिकेच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे तिथे पालिकेकडून काहीच उपाय होत नाहीत. जर या ठिकाणी स्वच्छता ठेवली, तर हे अतिशय सुंदर असे पक्षी निरीक्षण केंद्र ठरेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.