केदारनाथ महाप्रलय :त्याला ''सहा वर्षां''नंतरही आई-वडिलांची प्रतीक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 03:51 PM2019-06-18T15:51:06+5:302019-06-18T16:52:00+5:30
कंबरेपर्यंत पाण्यातून चालताना बरेच मृतदेह दिसत होते, झाडे कोसळली होती, तर कुठे रस्ताच गायब होता. हे मोठे संकट दूर होऊन आपण कधी सुरक्षित स्थळी पोहोचू, अशा भावना तेव्हा मनात होत्या...
कल्याणराव आवताडे
पुणे : जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मोठा प्रलय आणला आणि अनेकांचा जीव घेतला. हा प्रलय १६ जून २०१३ रोजी रात्री उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात घडला होता. त्याच्या आठवणी आजही कायम असून, त्या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींच्या हृदयाचा ठोका आजही चुकतो. रस्ते, पूल वाहून गेले होते, तर हजारो नागरिक बेपत्ता झाले. घटनेला तब्बल सहा वर्षे झाली असली तरी त्यांचे कुटुंबीय अजूनही ‘ते’ परत येतील, अशा आशेवर आहेत. त्यापैकीच आंबेगाव बुद्रुक येथील दळवी कुटुंबीय बेपत्ता असणाºया आपल्या आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत.
नारायणराव कृष्णाजी दळवी हे पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील राहणारे, नामवंत पैलवान असल्याकारणाने पुणे महानगरपालिकेने रखवालदार म्हणून कामास घेतले होते. २०१२ मध्ये त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पाऊस अधिक असल्याने अर्ध्या वाटेतून परत यावे लागले होते. त्यानंतर १२ जून २०१३ ला सपत्नीक शिवगौरी यात्रा कंपनीच्यावतीने पुण्यातून ७० लोकांसह ते यात्रेला निघाले. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ प्रवास करून १५ जूनला रात्री नऊ वाजता ते केदारनाथला पोहोचले, १६ जूनला दुपारी याच परिसरातील रामवाडी येथे पोहोचल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळी काही पर्यटक पुढे चालत निघाले, तर काही जण रामवाडीतच थांबले, मात्र रात्रीतच गांधी सरोवर ढगफुटीने पूर्ण फुटले आणि त्यांचा संपर्क तुटला, २३ जूनला मुलगा अमोल दळवी यांनी थेट केदारनाथ गाठले, दरम्यान, २४ जूनला आर्मी रेस्क्यूने वाचवलेल्या पर्यटकांची यादी दिली, त्या यादीत दळवी पती-पत्नीचे नाव होते. मुलगा अमोल दळवी यांनी तेथील पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही केली. पण अद्यापही काहीच पत्ता लागलेला नाही, असे अमोल दळवी यांनी सांगितले.
.......
कंबरेपर्यंत पाणी अन् आजूबाजूला मृतदेह
नऱ्हे : कंबरेपर्यंत पाण्यातून चालताना बरेच मृतदेह दिसत होते, झाडे कोसळली होती, तर कुठे रस्ताच गायब होता. हे मोठे संकट दूर होऊन आपण कधी सुरक्षित स्थळी पोहोचू, अशा भावना तेव्हा मनात होत्या, हे बोल आहेत केदारनाथ येथील महाप्रलयातून सुखरुप घरी आलेले खेडेकर पती-पत्नी यांचे. त्या घटनेला सहा वर्षे झाली असली, तरी आजही त्याच्या जखमा मनात ताज्या असल्याचे त्यांनी सांगितले. आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून येणारे पाणी ते रोखू शकले नाहीत.
दत्तात्रय खेडेकर त्यांच्या पत्नी नंदा खेडेकर यांच्यासह केदारनाथला गेले होते. ते केदारनाथला १५ जूनला रात्री नऊ वाजता पोहोचले, १६ जूनला दुपारी याच परिसरातील रामवाडी येथे पोहोचल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळी त्यांनी काही पर्यटकांसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला, तर काही जण रामवाडीतच थांबले, मात्र रात्रीची वेळ झाल्याने त्यांची पत्नी नंदा व त्यांची चुकामूक झाली आणि गांधी सरोवर ढगफुटीने पूर्ण फुटले आणि त्यांचा संपर्क तुटला. त्यांची पत्नी नंदा यांनी एका महिलेस डोंगर उतरण्यास सुरुवात केल्यानंतर एका ठिकाणी लाईट्स दिसत असल्याने त्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आणि एका गावात आश्रय घेतला. दरम्यान, दत्तात्रय खेडेकर यांच्या पत्नी नंदा विनाअन्नपाणी तब्बल तीन दिवस तेथील एका पोलीस चौकीबाहेर पतीची वाट पाहत उभ्या होत्या. दरम्यान, त्यांचे पती तेथील एका दुकानात पाण्याची बाटली विकत घेताना दिसल्यानंतर त्यांनी पळत जाऊन पती दत्तात्रय यांना कवटाळले आणि ताटातूट झालेल्या पती-पत्नीची भेट झाली, त्यानंतर त्यांना आर्मीने सुखरुपपणे सुरक्षित स्थळी नेले, त्यानंतर ते २२ जूनला पुण्यात सपत्नीक परतले. अग्निशमन दलात पाच वर्षे काम केले असल्याने जखमी मदतीची याचना करणारे पाहून जीव कासावीस व्हायचा, असे खेडकर म्हणाले.
.......................
माझे आई-वडील अजूनही आहेत ह्यावर माझा विश्वास आहे, कारण आर्मी रेस्क्यूच्या यादीत त्यांचे नाव आहे, शिवाय तीन लोकांनी तिथे माझ्या आई-वडिलांना पाहिल्याचेही सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले असले, तरी आई-वडील परत येतील, यावर माझा विश्वास आहे.- अमोल दळवी, आंबेगाव