केडगावला स्वच्छतागृहाचा त्रास
By admin | Published: May 30, 2017 02:04 AM2017-05-30T02:04:57+5:302017-05-30T02:04:57+5:30
येथील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. सर्वप्रथम ३० हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : येथील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. सर्वप्रथम ३० हजार लोकसंख्या असणाऱ्या केडगावसाठी ग्रामपंचायतीने २ वर्षांपूर्वी प्रलंबित स्वच्छतागृह १२ लाख रुपये खर्चून बांधले.
हे स्वच्छतागृह बाजार मैदानावर असल्याने येथे कायम वर्दळ असते. या स्वच्छतालयाचे स्त्री व पुरुष असे २ विभाग आहेत. सध्या अस्वच्छतेने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पुरुष स्वच्छतागृहात विल्हेवाट व्यवस्थित होत नसल्याने पाणी प्रवेशद्वारावर साचलेले दिसते. आतमध्ये प्रवेश करताच घाण व दुर्गंधीमय मुतारी दिसते. बेसिन व मुतारीचा प्रत्येक नळ तुटलेला आहे. आतमध्ये गुटखा व पान यांच्या थुंकीने परिसर अस्वच्छ आहे. एकमेव शौचालय अस्वच्छ आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
वास्तविक पाहता दररोज स्वीपरकडून स्वच्छतागृह स्वच्छ होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता होत नाही. त्यामुळे लोकवस्ती व सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
याशिवाय स्टेशन परिसरासाठी दररोज एक घंटागाडी असते. सध्या या घंटागाडीमध्ये कचरा साचला आहे. उर्वरित कचरा जमिनीवर पडला आहे अशी अवस्था या घंटागाडीची आहे. तांत्रिक बिघाड, चालकाचा अनियमितपणा यामुळे ही घंटागाडी बंद असते.
स्टेशन परिसरात झालेली गटार योजनेचे पाणी अधूनमधून रस्त्यावर वाहताना दिसत असल्याचे चित्र आहे.
खरमरीत टीका : सोशल मीडियावर टीकेचा भडीमार
केडगाव येथील एका ग्रामस्थाने गेल्या आठवड्यात केडगावमधील अस्वच्छता या सदराखाली सार्वजनिक ठिकाणचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोवरून प्रशासनावर केडगावमधील ग्रामस्थांनी विशेषत: युवकांनी खरमरीत टीका केली होती.
करातून बाजारमैदान स्वच्छ व्हायला हवे?
दर मंगळवारी केडगावला आठवडेबाजार भरतो. बाजार संपल्यावर दुसऱ्या दिवशी परिसरात असणाऱ्या कचरा शेळ्या खाताना दिसतात. वास्तविक पाहता प्रशासनाला बाजारातून कर मिळतो. या उत्पन्नातून बाजारमैदान स्वच्छ होणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.