शांतता राखा! कोरेगाव भीमा, २ हजार विद्यार्थ्यांची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:50 AM2018-01-06T02:50:21+5:302018-01-06T02:50:24+5:30
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, येथील संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून शांतता रॅली काढून गावातील तरुणांना सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला.
कोरेगाव भीमा - शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, येथील संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून शांतता रॅली काढून गावातील तरुणांना सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला.
पोलिसांच्या वतीने या गावामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुल आहे. आज पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक बरकत मुजावर व पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी गावातील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी हातामध्ये सामाजिक एकतेचे संदेश देणारे फलक घेऊन ‘सामाजिक एकता-प्रगतीचा रस्ता, हम सब एक है!, भारतमाता की जय’ अशा घोषणा देत महापुरुषांचे विचार लोकांना सांगत गावातून शांतता रॅली काढली.
या वेळी दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांसह, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, माजी सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. टी. पाटील, पर्यवेक्षक एच. आर. जाधव, फ्रेंड्सचे स्कूल अध्यक्ष राजाराम ढेरंगे, दिलीप भोसले, दोन्ही शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
ही रॅली वढू रस्त्यावरून डिंग्रजवाडी फाटा, ग्रामपंचायत कार्यालय येथून मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर व पुणे-नगर महामार्गावरून कोरेगाव भीमा येथील चौकीजवळ या रॅलीची सांगता झाली.
‘कोरेगाव भीमा येथील झालेली दुर्घटना दुर्दैवी असून गावातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही समाजाच्या नागरिकांनी सलोख्याचे वातावरण जपण्याची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
सामाजिक तेढ निर्माण झाल्याने सर्वांचेच नुकसान झाले आहे. भरकटलेल्या तरुणांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक सलोखा शिकण्याची गरज आहे.
जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी नागरिकांनी आपापले व्यवहार सुरळीत करण्यावर भर देण्याचे आवाहनही करण्यात आले.
- बरकत मुजावर , पोलीस उपअधीक्षक
बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका - गिरीश बापट
कोरेगाव भीमा : दिवंगत राहुल फटांगडे कुटुंबास शासनस्तरावर शक्य ती मदत करणार असल्याचे सांगून स्थानिकांची बाजू ऐकून घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. नुकसानग्रस्तांचे वस्तुस्थितीला धरून पंचनामेही करण्याचा आदेश प्रशासनाला दिला असल्याचे सांगून बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन करून गावात शांतता ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगाचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, धर्मेंद्रजी खांडरे, राहुल गवारे, केशव फडतरे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या वेळी बापट यांनी कोरेगाव भीमा दंगलीमध्ये डिंग्रजवाडी फाट्यावरील उद्योजक जयेश शिंदे यांच्या छत्रपती अॅटो या चारचाकी वाहनाच्या शोरूमचे दंगलग्रस्तांनी केलेल्या जाळपोळीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांनी पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आवाहन केले. शासनामार्फत या पारदर्शकपणे तपास करून दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.
यानंतर त्यांंनी दंगलीमध्ये मृत झालेल्या राहुल फटांगडे या युवकाच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, दत्तात्रय हरगुडे, पंडित दरेकर, शिवाजी दरेकर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बापट यांनी शासनामार्फत शक्य तेवढी मदत करणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या वेळी फटांगडे याच्या नातेवाईकांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत स्थानिकांनी गावचे रक्षण केल्यामुळे महिला व लहान मुलांचे रक्षण होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून स्थानिकांवर खोटे गुन्हे नोंदवू नये, अशी मागणीही या वेळी केली.